पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१८३

करण ही दोन्ही कार्यरत असतात; परंतु डोळे मिटून मी विचारास सुरवात करतांच उपकरणाचे कार्य थांबतें व फक्त अंतस्थ गोलकाचे कार्य सुरू असते. बहिरिंद्रिय अथवा उपकरणद्वारा वस्तूंची चित्रे सांठवून त्यांच्याद्वारें मनास चलन देणे हे गोलकांचे कार्य होय. एखादा गोलक क्रियाभ्रष्ट झाला तर त्याच्या द्वारे उद्भत होणारे विचारहि आपोआप बंद पडतील हे यावरून उघड दिसून येईल. आपणांस एखाद्या वस्तूविषयी विचार करावयाचा झाला तर त्या वस्तूचे चित्र आपल्या अंतश्चक्षूपुढे असल्यावांचून तिजविषयी आपणांस विचारच करता येत नाही. त्या वस्तूची कोणत्या तरी प्रकारची प्रतिमा दृग्गोलकापुढे नसेल तर मनास चलन देण्याचे काही हत्यारच त्याजपाशी नाही, असे होऊन मनास चलन देण्याची क्रिया त्याजकडून होणार नाही. अंतश्चक्षंपुढे ह्मणजे दृग्गोलकांपुढे काही प्रतिमा अथवा चिन्ह असल्यावांचून एखाद्या आंधळ्यासहि विचार करता येणे शक्य नाही. सर्व इंद्रियांत डोळे आणि कान ही इंद्रियें अत्यंत चपल असतात. इंद्रिय हा शब्द येथे गोलक अथवा अंतरिंद्रिय या अर्थी वापरला आहे असे समजावें. शरीरावरील डोळे आणि कान ही उपकरणे असून त्यांचे गोलक मेंदूत असतात. जर काही कारणाने हे गोलक क्रियाशून्य झाले, तर बाहेरील डोळे व कान शाबूत असूनहि आपणांस कांही दिसणार नाही अथवा कांहीं ऐकूहि येणार नाही. यावरून मनाच्या स्वैरपणास आळा घालावयाचा असेल, तर या गोलकांचे नियमन करणे अवश्य आहे, ही गोष्ट आपणांस नि:संशय पटलीच असेल. मनाच्या आणि गोलकांच्या नित्य चालणाऱ्या व्यवसायास आळा घालणे यासच शम-दम अशी संज्ञा आहे. मनाला बाह्य वस्तूंत गुंतूं न देणे याला शम आणि बहिरिंद्रियांस अथवा उपकरणांस निर्व्यापार करणे यास दम असें ह्मणतात. ज्ञानमंदिरास पोहोचविणाऱ्या सोपानपथाची ही पहिली पायरी आहे.

 यानंतर तितिक्षा ही दुसरी पायरी लागते. एकंदर साधनसामुग्रीत तितिक्षा ही प्राप्त करून घेण्यास अत्यंत कठिण आहे. ही प्राप्त करून घेण्याच्या तयारीस आपण लागलों ह्मणजे 'ब्रह्मज्ञान नव्हे लेंकराच्या गोष्टी' असें आपल्या प्रत्ययास येते. तितिक्षा ह्मणजे पूर्ण क्षमावृत्ति. अप्रतिकाराच्या तत्वाचा निःसीमत्वाने अंगिकार करणे याचें नांव तितिक्षा. आपल्या अंगी तितिक्षा येण्याकरितां आपण अभ्यासास सुरवात केली म्हणजे तितिक्षत्व किती कठीण आहे, याचा आपणांस अनुभव येऊ लागतो. कोणाचाहि प्रतिकार न करण्याचे व्रत आपण स्वीकारलें ह्मणजे बहिरिंद्रियांवर आपण कदाचित् ताबा ठेवू शकू; परंतु आपले मन ताब्यांत