पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१८१

आणि कसें खाड्यांत घालील याचा नेम सांगवत नाही. याच्या नादी लागून आपण आपलाच गळा कापून घेत आहो. आपल्या विश्वजननीशी आपण निमकहराम होत आहों. 'खालस इक भगवान भरोसे । तनमन क्यों नहिं छोड दिया ॥' असा प्रश्न अनेक महात्मे आपणांस विचारीत आहेत, त्यांस आपण काय उत्तर देणार! चला, या तुच्छ शरीराच्या आणि विश्वासघातकी मनाच्या नादी न लागतां आपण आपले सर्वस्व आपल्या विश्वजननीस अर्पण करूं या.'परमेश्वरा, तुझी मर्जी' असें वाक्य जो दोनदां उच्चारतो तो पापी असे एका हिंदुतत्ववेत्त्याचे ह्मणणे आहे, ते किती खरे आहे ! जी गोष्ट खरी, ती खरीच. तिचा पुन्हां उच्चार करावासा वाटणे ह्मणजे तिच्या सत्यत्वाबद्दल एकवेळ शंका घेण्यासारखे आहे. तिचा पुन्हां उच्चार करण्याची जरूरच नाही. आतां आपण हा उच्चार एकच वेळ करूं. 'परमेश्वरा, तुझी मर्जी.' आतां यांतून परत फिरणे ह्मणजे पाप करणेच आहे.