पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

त्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ।' असें साक्षात् परमात्म्याचे वचन आहे. सर्व धर्मग्रंथांतून परमेश्वराने अशी वचनें दिली आहेत 'परमेश्वरा, आह्मीं आपलें सर्वस्व तुला अर्पण केलें आहे! आमची बरीवाईट सर्व कृत्ये तुला अर्पण केली आहेत. आमची पुण्य कर्मे आणि पाप कमें अशी दोन्ही तुला अर्पण असोत. आमची दुःखें, आमचा आनंद ही सर्व तुझ्या पायी वाहतो.' अशी प्रार्थना आपण मनापासून करावयास पाहिजे. परंतु आम्हां मनुष्याचे चित्त किती क्षणभंगुर आहे ! एका क्षणी आह्मी आपला सर्व भार त्याच्यावर सोपवितों आणि दुसऱ्याच क्षणी क्रोधास वश होऊन 'मी' ह्मणूं लागतों!

 सर्व धर्माचें लक्ष्य एकच आहे. तुमच्यांतील क्षुद्र अहंकार समूळ नाहीसा करून तुह्मांस विश्वव्यापी करावयाचे हेच सर्व धर्माचे ध्येय आहे. सर्व धर्मकल्पना या एका साध्यासाठीच निर्माण झाल्या आहेत. 'दुसऱ्याचा मत्सर करणारा मी परमेश्वर आहे. माझ्यावांचून तूं दुसऱ्याचें ध्यान करूं नको' असें हिब्रू धर्मग्रंथांत हटले आहे. याचा अर्थ हाच की जोपर्यंत तूं अहंकाराचें ध्यान करीत आहेस, जोपर्यंत अहंकार तुझ्या अंत:करणांतून नाहीसा झाला नाही, तोपर्यंत माझा (परमेश्वराचा) वास तेथे होणार नाही. अंतःकरणांत परमेश्वराचा वास हवा असेल तर इतर सर्व बिऱ्हाडकरूंनां हांकून लाविले पाहिजे. तेथे दुसरा कोणी रहिवासी आला, तर परमेश्वर दुसरीकडे चालता होईल. 'मी' 'मी' नाहीसे होऊन त्या जागी 'तूं' 'तूं' आले पाहिजे. परमेश्वराला स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणांत भागीदार असलेला खपत नाही. अत्यंत अट्टहासाने 'मी' सोडण्याचा प्रयत्न केला तरी केव्हां केव्हां चूक होतेच. आपला पाय केव्हां तरी घसरतोच. अशा वेळी आपणांस कोणी तरी मदतगार लागतो. अशावेळी विश्वजननीस आपण हाक मारावी. शेवटच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपणांस अनेक जागी मुक्काम कराव याचा असून 'तुझी मर्जी' ही एक वाटेतली धर्मशाळा आहे. सर्व काही त्याच्या मर्जीवर सोपविणे ही मुक्तिसोपानाची एक पायरी आहे. अशी भावना करण्याचा प्रयत्न करीत असतां मध्येच हे द्वाड मन उसळी मारते . 'ज्यो मर्कट तरूपर चढकर । डारडारपर लटकत है। चंचळ मन निसादन भटकत है | ब्रह्मानंद समीप छोडकर । तुच्छ विषयरस गटकत है॥' अशी मनाची अवस्था आहे. असें आहे तरी क्षणोक्षणी या भावनेस चिकटून बसण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यावांचून हे मन आपल्या ताब्यांत येणार नाही. मन अत्यत विश्वासघातकी आहे. आपण याची नोकरी पत्करली तर हे आपणांस केव्हा