पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

सर्वांच्या अंतःकरणांत उदय पावावा, अशी आपण त्या सर्वेश्वराची प्रार्थना करूं या. त्याच्या सर्वव्यापी अस्तित्वाचा प्रत्यय जेव्हां आपणांस येईल, तेव्हांच आपण अमर आहों, हे आपणांस नि:संशय पटेल. आपण वस्तुतः शरीरानेंहि अमर असून या विश्वाशी एकरूप आहों. या सर्व विश्वाचे अधिष्ठान एकच आहे आणि त्याच एकांत माझेंहि वास्तव्य आहे. मी या शरीरांत दिसतों तितका लहान प्राणी नसून विश्वव्यापी आहे. पूर्वी होऊन गेलेली सृष्टिहि मीच. बुद्ध तो मीच, येशू मीच आणि महंमदहि पण मीच. जितके धर्मप्रवर्तक आजपर्यंत होऊन गेले ते सर्व मीच. जगांतील चोऱ्या करणारे मीच आणि फांसावर चढलेले खुनी लोकहि मीच. मी जेथें नाहीं असें ठिकाण अनंत विश्वांत एकहि नाही. प्रिय बंधूंनो, जागे व्हा. आपल्या लहान लहान खबदाडांतून बाहेर पडून अफाट मैदानावर या आणि या खऱ्या आराधनेच्या मार्गास लागा. तुह्मी अनंत असतां आपल्याच इच्छेनें क्षुद्र देहांत स्वतःस कोंडून बसला आहांत. सर्व विश्वांत त्याचेच रूप पाहणे, ब्रह्मापासून क्षुद्र तृणापर्यंत त्याचाच वास आहे हे जाणणे, हीच खरी लीनता. नुसते डोळे मिटून 'अरे परमेश्वरा, आह्मी पापी, आह्मी दीन' असे ओरडणे ही लीनता नसून लीनतेची थट्टा आहे. आपल्या डोळ्यांवर असलेला पडदा दूर होऊन सर्वत्र परमेश्वराचे स्वरूप दिसू लागणे हीच आपली अत्युच्च संस्कृति आणि हीच मानवकुलाच्या उत्क्रांतीची शेवटची पायरी. सर्वत्र एकरूप दिसणे हाच खरा धर्म. 'मी' अमुक ( देहधारी ) असें वाटणे हे 'मी 'चें खरें स्वरूप नव्हे. 'मी' सर्वव्यापी, सर्व भूतांतरात्मा आहे, अशा भावनेने सर्वत्र स्वतःस पाहणे हेच खरें पूजन. बाह्योपचारयुक्त पूजाविधि हे खालच्या पायरीचे दर्शक आहेत. या जड विधींस फांटा देऊन सर्वत्र एकच चैतन्य पाहणे, हा अत्युच्च पूजाविधि आहे. अंतःकरण जसजसें शुद्ध होऊ लागते, तसतसा बाह्य पूजाविधि कमी होऊन मनुष्य मानसपूजा करूं लागतो; व युक्त मानसपूजेच्या योगाने परमश्वराच सर्वव्यापी रूप त्यास दृग्गोचर होऊं लागून एकच चैतन्य सर्वत्र पाहणं हाच खरी पूजा असा त्यास प्रत्यय येतो. विश्वांतील साऱ्या जड पदार्थास मर्यादा असून त्या मर्यादेत ते नियमाने जखडले आहेत. चैतन्य मात्र अमर्याद-नि:सीम-अस आहे. परमात्मा णजे केवळ चैतन्यरूप आहे आणि ह्मणूनच तो अमर्याद आहे. त्याच प्रमाणे मनुष्यांत दिसणारी जीवनकलाहि चैतन्यरूप आणि ह्मणून अमर्याद आहे. मर्यादित वस्तु अमर्याद वस्तूला जाणूं शकत नाही, व तिचे पूजनहि करूं शकत नाही. अमर्याद वस्तूच अमर्याद वस्तूला जाणून तिचे पूजन