पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७७

गरजेच्या पलीकडे जाऊं ह्मटले, तर ती गोष्ट शक्य दिसत नाही. आपणांस सर्व विश्वाचे आधिपत्य मिळाले तरी आपल्या गरजा संपणार नाहीत. गरजेच्या पलीकडे जावें याच हेतूने प्रेरित झालेला मारवाडी कवडी कवडी करतो, चोर चोऱ्या करितो, पापी पापें करितात आणि आपण तत्वज्ञानाचा विचार करितां. सर्वांचे ध्येय एकच; गरजेच्या पलीकडे जाण्याच्या इच्छेव्यतिरिक्त दुसरी कोणतीहि इच्छा साऱ्या आयुष्यात कोणास उत्पन्न होत नाही. कोणास समजो अगर न समजो पण आपले सर्वांचे प्रयत्न या एकाच दिशेने चालले आहेत. पूर्णत्व पावण्यासाठी ही सारी धडपड आहे आणि केव्हांना केव्हां हे पूर्णत्व पावतीलच.

 अत्यंत पातकी आणि पातकें करण्यांत सदोदित दंग असलेला माणूसहि शेवटी गरजेच्या पलीकडे जाईल. मात्र, तसें व्हावयास काळहि पुष्कळ पाहिजे, हे उघड आहे. अशा ठिकाणी आपल्या खटपटीपासून त्यास कांहींच उपयोग होणार नाही. धक्के चपेटे खाऊनच तो परमेश्वराकडे वळेल. सद्गुण, पावित्र्य, परोपकाररतता इत्यादि दैवी संपत्ति सर्वोसच प्राप्त होणार आहे. आपली सर्व खटपट कशाकरितां आहे, हे कित्येकांच्या लक्ष्यांत आलेले नाही; परंतु तुमच्या लक्ष्यांत तें आतां आले आहे. पॉल प्रेषित एकदां ह्मणाला, “ज्या देवाची तुह्मी अज्ञानानें पूजा करीत आहां, तो देव तुमच्या ठिकाणी आहे असें मी तुह्मांस सांगतो." पॉलचे हे वाक्य सर्वांनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. आपल्या आयुष्यांतील ज्या एका लक्ष्याकडे आपण सर्व धांव घेत आहों, त्या लक्ष्याला लवकर पोहोचण्यास आमची सर्व शास्त्रे आणि सर्व तत्वज्ञान यांचा उपयोग न झाला, तर ती निर्माण तरी झाली कशाला ? सर्व चराचरास व्यापून राहिलेले मूलतत्व आपणच आहौं, ही गोष्ट अनुभवाने पाहणे हेच आपले साध्य आहे. परमेश्वराला आकुंचित स्वरूपांत पाहणारे पंथ आणि धर्म सोडून सर्व विश्वांत तोच भरून उरला आहे असा अनुभव पटविणाऱ्या धर्माची कांस आपण धरूं या. परमेश्वराचे अस्तित्व तुह्मांस खरोखर अंत:करणापासून मान्य असेल तर तुह्मांप्रमाणेच विश्वांतील सर्व पदार्थ त्याचीच आराधना करीत आहेत, ही गोष्ट तुह्मांस नि:संशय पटेल.

 आपण आपला आकुंचितपणा टाकून प्रत्येक मनुष्यांत एकाच परमात्म्याचें रूप प्रकट झाले आहे, हे जाणण्यास शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या अंतर्यामांत त्याचाच वास असून या निरनिराळ्या दिसणाऱ्या सर्व मनांत विचाराची प्रेरणा तोच करितो. त्याची सिद्धि बाह्य साधनांवर अवलंबून नसून तो स्वतःसिद्ध आहे. अशा प्रकारचा प्रत्यय येणे हाच धर्म. हाच खरा विश्वास. असा विश्वास आपणास्वा. वि. १२