पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुनियेत आपण पाहतो. समता नसल्यामुळे आपल्या अंध झालेल्या नजरेस परमेश्वर दिसत नाही.

 एकाच वृक्षाच्या दोन निरनिराळ्या शाखांवर सुंदर पिसाऱ्याचे दोन पक्षी बसले होते. एक अगदी टोकाजवळच्या शाखेवर होता आणि दुसरा बुंधाजवळील शाखेवर बसला होता. बुंधाजवळील शाखेवर बसलेला पक्षी त्या झाडाची फळे खात होता. त्यांत कित्येक फळे गोड व कित्येक कडू होती. तो दोहोंचीहि चव घेत होता. एखाद्या फळाला चोंच मारून ते कडू लागले म्हणजे तो आपले तोंड वेडेवांकडे करी आणि दु:खी होई. पुन्हां त्याने आणखी एकदां दुसऱ्या फळाला चोंच मारिली, तों तें पहिल्यापेक्षांहि अधिक वाईट असल्याचे त्यास आढळून आले. तो शोक करीत असतां त्याची नजर सहजगत्या वर गेली, तों वर दुसरा एक पक्षी बसला असल्याचे दिसून आले. तो दुसरा पक्षी अगदी शांत होऊन बसला असून कांहींहि खात नव्हता. पहिल्या पक्ष्याने त्याजकडे पाहून पुन्हां आपली नजर फळांकडे वळविली व फळे खाण्याचा आपला उद्योग त्याने पुन्हां सुरू केला. इतक्यांत एक अत्यंत कडू फळावर त्याने चोंच मारली. त्या फळाची थोडी चव घेतांच त्याला अत्यंत दु:ख झाले व त्याने पुन्हा एकवार आपली नजर वरील पक्ष्याकडे वळविली. वरचा पक्षी पहिल्यासारखाच निःसीम शांततेचा उपभोग घेत होता. खालच्या पक्ष्याला त्याच्या त्या स्थितीचे मोठे कौतुक वाटून तो हळूहळू त्याजकडे जावयास निघाला. तो त्या पक्ष्याच्या अगदी जवळ आला. इतक्यांत प्रकाशाचे शुभ्र किरण त्याच्या अंगावर पडले. त्याच्या आजुबाजूस जिकडे तिकडे तेच किरण पसरले होते. त्या प्रकाशाने दिपलेले आपले डोळे त्या पक्ष्याने उघडून पाहिले तों वर बसलेला पक्षी दुसरा कोणी नसून आपलेच तें मूलबिंब होतें असें त्यास आढळून आले. आपणच आपल्या बिंबास निराळा पक्षी समजत होतो, असे त्याच्या प्रत्ययास आले. खालील पक्षी हा वरच्या पक्ष्याचे प्रतिबिंबच होता. ही गोष्ट त्याला कळल्यानंतर त्याचा भ्रमनिरास हाऊन तो शांत व संपूर्ण वैभवयुक्त असा झाला. त्या पक्ष्याप्रमाणे आम्हीही स्वतः परमेश्वररूप असून प्रतिबिंबामुळे आपली हजारों रूपें दिसतात. एकच सूर्य दवाच्या हजार बिंदूंत प्रतिबिंबित झाला तर ज्याप्रमाणे हजार लहान लहान सूर्य दिसू लागतात, त्याचप्रमाणे एकच परमात्मा हजारों ठिकाणी व्यक्त झाल्यामुळे हजारों रूपांनी दिसू लागतो. आमच्या मूळच्या स्वरूपास आपणांस जाणे असेल तर हे प्रतिबिंब आपण सोडून दिले पाहिजे. आपल्या गरजा भागवून आपण