पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७५

अनेक-बहुतेक सर्व आहेत; परंतु दु:खालाहि प्रेमाने मिठी मारणारे कितीसे आढळतील ? या दोहोंतहि एकच रूप पाहणे व या दोहोंचीहि आराधना न करणें-हाच मुक्तीचा मार्ग. 'दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृहः' असे आपण झाल्यावांचून मोक्षश्री आपणांस माळ घालणार नाही. ती शूराची चहाती आहे. सुखदुःखें, भय, चिंता इत्यादि अनेक दरवाजे मोक्षमार्गात आपणांस अडथळा करण्यासाठी बंद होऊन बसले आहेत. हे फोडल्यावांचून आपणांस पलीकडे कसें जातां येईल? परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा होऊन आपण त्या मार्गाने जाऊ लागल्याबरोबर प्रथम आपलेंच शरीर आपल्या आड येते. सृष्टीचे कायदेहि आपला मार्ग निरोधूं लागतात. आपली दृष्टि अंधुक होते आणि आपणांस परमात्म्याचे दर्शन घडत नाही. जगांतील भीतिस्थाने, संकटे आणि दुःखें यांतहि त्याचेच वास्तव्य आहे, ही गोष्ट पटल्याखेरीज त्याचे दर्शन आपणांस होणे शक्य नाही. दोरीला सर्प समजून आपण भीत आहों. एकवार भीतीनें आपलें ठाणे अंतःकरणांत दिल्यावर जिकडे पाहावें तिकडे अंधार दिसतो. 'दोरीच्या सापा भिऊनि भवा । भेट नाहीं जिवा शिवा । अंतरिंचा ज्ञानदिवा। मालवू नकोरे ॥' हा उपदेश किती योग्य आहे बरें! सद्गुणांत परमेश्वराचा वास आहे असे सांगणारे पुष्कळ आहेत. परंतु मी तुझांस सांगतों की सद्गुणांत ज्या परमेश्वराचा वास आहे त्याच परमेश्वराचा वास पापांतहि आहे. पापालाहि मिठी मारण्याइतके अलोट धैर्य तुह्मांपाशी नसेल तर तुमच्यासारख्या क्लीबास मुक्ति वरील काय ? असें प्रचंड धैर्य ज्यावेळी आपल्या ठिकाणी येईल, आनंददायक वस्तु आणि दुःखप्रद वस्तु, नयनमनोहर रूपें आणि भयप्रद रूपें यांच्या ठिकाणी एकाच परमात्म्याचा वास जेव्हां आपणांस दिसू लागेल, तेव्हां मोक्षमार्गातले सर्व बंद असलेले दरवाजे खडाखड उघडतील. अशा स्थितीनंतरच सर्वत्र समभाव आपणांस दिसू लागेल. मोक्षपथ जितक्या झपाट्याने आपण आक्रमण करूं तितक्या झपाट्याने दुःखें आपणापासून पळू लागतील. स्वर्ग आणि नरक हे दोन्ही एकसारखेच सुखदायक आहेत, असा आपणांस अनुभव येईल. भेददृष्टि नाहींशी होऊन हा लहान आणि तो मोठा अशी खोटी रूपें आपणांस दिसणार नाहीत. सर्वांच्या अंतर्यामी एकाच परमेश्वराचा वास असतां लहान कोण आणि मोठा कोण ? 'रामसभामें हरिजन बैठे। को बडा को छोटा है!' इतकी समता आपल्या दृष्टीत आल्यानंतर विश्वांत सत्य ह्मणून जे काही असेल त्याची व आपली भेट होईल. आपल्या दृष्टीत समता नसल्यामुळे बरे आणि वाईट असे प्रकार या