पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७३

त्याच्याच पूजनांत गुंतले असून आपला सर्वांचा मार्गदर्शकहि तोच आहे. जगांत जितके चांगले आहे तितकें सर्व त्याचेंच स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे ज्याला वाईट ह्मणून आपण ह्मणतो, तेंहि त्याचेच स्वरूप आहे. कोणी मनुष्य कांही वाईट गोष्ट करितो, पाप आचरितो, ह्मणून आपण त्याचा तिरस्कार करितों; परंतु त्याचा तसे करण्यांत उद्देश काय, याचा आपण विचार केला पाहिजे. पापाचरण हाहि परमेशपूजनाचा एक मार्ग आहे, हे ह्मणणे तुह्मांस खचित विलक्षण वाटेल; पण वस्तुस्थिति तशीच आहे. अत्यंत पापी मनुष्याच्या हृदयांतसुद्धां मुक्तीची इच्छा आहे. ज्याला तुह्मी पापाचरण ह्मणतां तें कृत्यहि तो या इच्छेनें प्रेरित होऊनच करीत असतो. त्याचा मार्ग चुकीचा असेल ही गोष्ट वेगळी. पण त्याची इच्छा मुक्त होण्याची-गरजेच्या पलीकडे जाण्याची-आहे ही गोष्ट तुह्मांस केव्हांहि नाकबूल करता येणार नाही. मग त्याचे कृत्य ह्मणजे वस्तुतः परमेश्वराचे पूजनच नव्हे काय ? गरजेच्या पलीकडे जाण्याची-मुक्त होण्याची इच्छा त्याच्या हृदयांतून मावळली तर जगणेहि त्याला शक्य नाही, हे आपण नुकतेच सिद्ध केलें आहे. विश्वांत जेथे जेथें यत्किचित् तरी हालचाल दिसते, तेथे तेथे मुक्तीची इच्छा उद्भवली आहे, हे आपण पक्कें लक्ष्यात ठेवा. अशी प्रत्येक वस्तु परमेश्वराच्या पूजनास लागली आहे. विश्वांतील यच्चयावत् वस्तूंच्या पोटी याच कल्पनेचा वास आहे. मुक्तीकरितां सर्वांची खटपट सुरू आहे. त्यांत फरक आढळून येतो, त्याचे कारण बाह्योपाधिभेद हे आहे. ही इच्छा व्यक्त करण्यासाठी उपयोगांत येणाऱ्या शरीरादि बाह्य साधनांत जो भेद आहे तोच वस्तुवस्तूंतील दृश्य भेदास कारण आहे. यामुळे बाह्यतः अनेकतेने भासणारे विश्व मूलतः एकच कसे आहे हे आपल्या लक्ष्यांत येईल. हीच कल्पना उपनिषद्ग्रंथांत चोहोंकडे व्यापून राहिली आहे. ईश्वर आणि आह्मी वस्तुतः एकाच मूलरूपाचे आहोत असें म्हटल्याबरोबर कित्येकांच्या अंगांवर शहारे येतात. 'आह्मी किती पापी आणि परमेश्वर किती पवित्र, तो आणि आम्ही एकाच स्वरूपाचे आहों हे ह्मणणे पापात्मक आहे' असें ह्मणणारे लोक पुष्कळ आहेत. परंतु सशास्त्र विचारांती या ह्मणण्यांत कांहींच तथ्य नाही, असे आढळून येईल. गुलाबाच्या फुलाचा मनोहर वास आणि फुलपाखरांच्या अंगावरील चित्रविचित्र रंग ही त्याचीच स्वरूपें आहेत. आमच्यांत व्यक्त होणारे चैतन्य हेहि त्याच परमेश्वराचे रूप आहे. या सर्व जगाचे अस्तित्व त्याजवरच अवलंबून आहे आणि 'कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः' असें ह्मणणारा या जगाचा संहारकर्ताहि तोच आहे. तो जसा