पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

जसा आपल्या ठिकाणी दिसू लागतो, तसतसे आपलें बळ वाढत आहे असें आपणांस दिसून येते. केवळ मुक्त अशा स्थितींतला जर कोणी प्राणी असेल, तर तो सर्वशक्तिमान् , सर्वज्ञ आणि सर्वांतर्यामी असा असला पाहिजे हे उघड आहे. मुक्तस्थिति ही या सर्वशक्तींच्या अत्यंत साहचर्याने राहणारी असल्यामुळे मुक्तावस्थेपर्यंत गेलेला प्राणी सृष्टिबंधनापलीकडे जाणारच हेहि उघड आहे.

 केवळ मुक्ततेची स्थिति व तिजमुळे उद्भवणारी चिरशांति प्राप्त करून देणे, हेच प्रत्येक धर्माचे ध्येय आहे. कोणत्याहि अवस्थेने अथवा कोणत्याहि काली निगडित नाही असे स्वातंत्र्य व ज्या अवस्थेत कोणत्याहि वस्तूच्या आघाताने यत्किंचिहि फेरबदल होणार नाही, अशी पूर्णावस्था ही प्राप्त करून देणे हेच धर्माचें साध्य आहे. ही पूर्णावस्था वस्तुत: आपणा सर्वांच्या ठिकाणी असून हीच खरी मुक्ति-स्वातंत्र्य-होय.

 परमेश्वर सदोदित या मुक्तावस्थेत असून आपण त्याच्याशी एकरूप होण्यासाठी खटपट करीत आहो. परंतु मध्यंतरी आपल्या ध्येयाचा आपणांस विसर पडून आपल्या रस्त्यांत आपण अनेक आडवाटा उपस्थित करून त्यांतून धावू लागतों व यामुळे आपला पहिला राजमार्ग बाजूस राहतो. कीर्ति, पैसा, स्त्री इत्यादि अनेक आडवाटा फुटून आपला गोंधळ उडतो व राजरस्त्याचे भान नाहीसे होते. या सर्व आडवाटा मिळून एक भला मोठा चक्रव्यूह झाला आहे. त्यांतून सुटून पुन्हा राजमार्गास लागावें, हीच आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु या आडवाटांत आणखी आडवाटा फुटून आपणांस अधिकाधिक भ्रमांत मात्र पाडतात. असो. जगांत वस्तुमात्राच्या ठिकाणी जें तेज प्रत्ययास येतें तें तेजहि त्यांस परमात्म्यापासूनच प्राप्त झाले. ते त्यांस सूर्यापासून, चंद्रापासून अथवा तारकांपासून प्राप्त झालेले नाही. कारण सर्याला तरी स्वतःचें तेज कोठून जात झालें ? ' यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् !' असें भगवान् श्रीकृष्णाचे वचन आहे. सूर्यांत आढळून येणारा प्रकाश असो अथवा आमच्या अंतर्यामी प्रत्ययास येणारा ज्ञानरूप प्रकाश असो, त्याची उत्पत्ति त्या महात्तेजापासून - परमेश्वरापासून-झाली. 'सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो । मत्तः स्मृतिज्ञानमपोहनं च' असें परमेश्वराचे वचन आहे. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व विश्व प्रकाशत आहे.

 या एकंदर विवेचनावरून परमेश्वरस्वरूपाची बरीच कल्पना आपणांस आली असेल. तो स्वयंव्यक्त, निराकार, सर्वोतर्यामी, सर्वज्ञ आणि सर्व विश्वाचे अधिष्ठान असा आहे, ही गोष्ट आता आपल्या लक्ष्यांत पूर्णपणे आली असेल. सर्व विश्व