पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१७१

सुख ही सुखाची परमावस्था नव्हे, असे त्याच्या मनांत येते. येथे शारीरिक सुखाची कल्पना संपुष्टांत येऊन मानसिक सुखाची कल्पना जन्म पावते. मानसिक सुखाची कल्पना उद्भवली की तिच्या मागोमाग पापपुण्य, बरें वाईट इत्यादि कल्पना उदय पावतात; व शेवटी हे सर्व बंध तोडून टाकून सर्वथैव स्वतंत्र होण्यास-मुक्त होण्यास-कांहीं उपाय नाही काय असा प्रश्न चित्तांत आपोआपच उद्भवतो. असा प्रश्न उत्पन्न होण्याजोगी अवस्था प्राप्त झाली, ह्मणजे अज्ञानाचे जे अत्यंत घन पटल असतें तें फाटावयास लगून ज्ञानरवीचे बालकिरण उदय पावू लागतात. यावेळी अज्ञानाचे अभ्रपटल इतकें घन असते की ज्ञानाच्या अरुणोदयास आपली दिव्यप्रभा त्यांतून व्यक्त करावयास अवसर मिळत नाही. यामुळे त्याच्या उदयाचा प्रत्यय येत नाही; तथापि त्याचा उदय झालेला असतो, हे मात्र निश्चित आहे. याच संपूर्ण ज्ञानरूपास एक, अद्वितीय, परमात्मा इत्यादि नांवें आपण देतो. यावेळी परमात्मा निराळा आणि विश्व निराळे अशी त्याची दृष्टि असते. विश्व त्याच्या दृष्टीस प्रत्यक्ष दिसत असतें ह्मणून तें खरें; आणि संपूर्ण ज्ञानरूपाचा, कल्पनेने तरी त्यास प्रत्यय आलेला असतो ह्मणून तेंहि खरें. अशा रीतीने त्याच्या अंतःकरणांत दोन सत्यवस्तूंचा वास असतो. सत्य ह्मणून दिसणाऱ्या दोन्ही वस्तु वास्तविक एकरूपच आहेत, याचा त्यास प्रत्यय नसतो. एकच वस्तु द्विधा भासणे हा स्वतःच्या दृष्टीचा दोष आहे, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आलेली नसते. शेवटी हाहि दृष्टिदोष नाहीसा झाला ह्मणजे सर्व विश्व एकरूपच असून निरनिराळ्या उपाधिभेदांमुळे तें अनेकधा भासते, अशी त्याची खात्री होते. मनुष्यांतील आणि पशुंतील अंतर्ज्ञान एकरूपच असतां शरीरोपाधीनें तें कमीअधिक प्रमाणाने व्यक्त होते; इतकाच मनुष्यांत आणि पशूत फरक आहे, ही गोष्ट त्याला पक्केपणी कळते.

 अनंतरूपांनी नटलेल्या या सृष्टीकडे अवलोकन केले तर यच्चयावत् वस्तुमात्र परमेश्वराच्या पूजनांत गुंतले आहे व त्याजकडेच धांव घेत आहे असें आपणांस आढळून येईल. ज्या ज्या ठिकाणी सजीवपणा आढळतो तेथें तेथें पूर्णरूपाकडे -मुक्तीकडे धाव घेण्याची प्रवृत्ति आढळते. आपण स्वतंत्र झालों-मुक्त झालों-तर या अनंत विश्वाचें स्वामित्वहि आपणांस मिळेल, हे उघडच आहे; परंतु ही मुक्ति ज्ञानावांचून मात्र मिळणार नाही. आपणांतील अज्ञानाचा पडदा जसजसा अधिक फाटत जातो, तसतसें ज्ञान अधिक व्यक्त दशेस येऊन त्याप्रमाणाने विश्वावरील स्वामित्व आपणांस प्राप्त होऊ लागते. या स्वामित्वाचा प्रत्यय जस