पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

विश्वनियमांनी आपण बांधले गेलो आहों, ही कल्पना जितक्या अंशानें खरी आहे, तितक्याच अंशाने मुक्तीची इच्छा आपल्या अंत:करणांत वास करीत आहे, ही कल्पनाहि खरी आहे.

 बद्धता आणि मुक्ति, ज्ञान आणि अज्ञान व पुण्य आणि पाप या नित्य सहचारी वस्तु आहेत. यांपैकी एका स्थितीची कल्पना चित्तांत उद्भवली, की तिच्या पोटी तिच्या दुसऱ्या सहचारी कल्पनेचा अंतर्भाव आपोआपच होतो. ज्या ज्या सृष्टिनियमांनी आपण बांधले गेल्यासारखे दिसतो, त्या प्रत्येक नियमाच्या पोटी स्वतंत्रतेचा-मुक्तीचा-गुप्तवास आहे. या कल्पनाद्वयापैकी कोणतीहि एक जितकी खरी आहे तितकीच दुसरीहि खरी आहे. अगदी रानटी स्थितीच्या मनुष्याकडे पाहिले, तर मुक्तीच्या कल्पनेचा उद्भव त्याच्या ठिकाणी विशेष उघडपणे प्रत्ययास येत नाही; याचे कारण विश्वनियमांनी आपण चोहोंकडून जखडले गेलों आहों, ही जाणीवहि त्याच्या ठिकाणी विशेषत्वाने उत्पन्न झालेली नसते. मुक्तीकरितां ज्या मानाने आपले प्रयत्न कमी अधिक दर्जाचे असतील, त्या मानाने सृष्टिनियमशृंखलेचा प्रत्यय आपणांस कमी अधिक प्रमाणाने येतो. 'आपण पापी आहों, अपवित्र आहों,' ही कल्पना सुधारलेल्या मानवसमाजांत ज्या प्रमाणाने आपल्या प्रत्ययास येते त्याप्रमाणे रानटी समाजांत आढळत नाही. 'आपण पापी आहों ही कल्पना अगदी रानटी अवस्थेतल्या मनुष्याच्या मनांत सहसा उद्भवतच नाही. कारण त्यांची स्थिति पशूच्या स्थितीपलीकडे फारशी गेलेली नसते. 'आपण पापी आहों' ही कल्पना पशूच्या चित्तांत कधीहि येत नाही. कारण बुद्धि ह्मणून जे तत्व मानवी हृदयांत उदय पावतें, त्याचा पशूच्या ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणाने उगम झालेला असतो. पशूच्या सर्व इच्छा पाहिल्या, तर त्याच्या गरजा जड देहापलीकडे गेलेल्या नसतात. जड देह सुखांत राहिला, ह्मणजे त्याच्या सर्व गरजा भागल्या. त्याचप्रमाणे रानटी अवस्थेतील मनुप्यांच्या इच्छाही जडदेहाच्या सुखसाधनापलीकडे नसतात. यानंतर मानसिक व बौद्धिक गरजा उत्पन्न होऊ लागतात. देह अत्यंत सुखांत राहण्याजागी अवस्था प्राप्त झाली, तरी आपण पूर्ण सुखी आहों असें मनुष्यास काहि वाटण्याचा संभव नाही. त्याचे स्वास्थ्य भंग पावेल अशा गोष्टी घडून येतात व त्या पुष्कळ वेळां त्याच्या आटोक्याबाहेर असतात. आपणास दु:खद अशी गोष्ट घडत आहे असे दिसून येत असूनहि त्याच्या प्रतिकाराचा कोणताच उपाय आपणांस दिसेनासा झाला ह्मणजे आपण परतंत्र आहों, पंगु आहों व शारीरिक