पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१६७

एवढेच नव्हे तर उलट त्या बंधनांत राहणें हेंच इष्ट आहे असेंहि वाढू लागते. परंतु आपण आपली दृष्टि थोडीशी अंतर्मुख केली तर आपल्या ठिकाणी या मानवीबुद्धीहून निराळ्या स्वरूपाच्या बुद्धीचाहि वास आहे, ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत येते. या दुसऱ्या बुद्धीला आपण थोडे चालन दिल्याबरोबर तिचा मानवी बुद्धीशी तंटा सुरू होतो. सृष्टिनिर्मित बंधनें तोडून पलीकडे जाण्याची त्या बुद्धीची आकांक्षा व्यक्त होऊ लागते. 'मुक्ति 'मुक्ति' या एकाच शब्दाचा ती बुद्धि जप करीत आहे. या बुद्धीनें प्रोरत झालेला जीवात्मा मुक्तीसाठी अट्टहास करीत आहे, आणि मानवीबुद्धि पुनःपुनः त्याला सृष्टिनियमांच्या पाशांनी बांधण्याचा यत्न करीत आहे. या सृष्टिनियमांच्या पाशांतच त्याने सर्वदा गुरफटलेले राहावें असें त्याच्या नशीबी लिहिले आहे काय ?

 सर्पपूजा, पिशाचपूजा आणि पूर्वजपूजा इत्यादि प्रकारचे अनेक पूजनांचे मार्ग अस्तित्वांत कां आले ? आपण बाहेरून कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करतों, ती कशाकरितां ? आपले जीवित, आपले अस्तित्व इत्यादि जे शब्द आपण उच्चारितों त्यांचा अर्थ काय ? आपल्या या साऱ्या प्रयत्नांचे पर्यवसान कोठे होणार, हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ही सारी धडपड खचित अर्थशून्य नाही. या साऱ्या धडपडीचा आणि अनंत प्रश्नमालिकेचा अर्थ हाच की, प्रत्येक जीवात्मा मुक्तीसाठी प्रत्येक क्षणीं यत्न करीत आहे. अनेक भौतिक शास्त्रे आज ज्या स्थितीस पोहोचली आहेत, ती या जीवात्म्याच्या हजारों वर्षोच्या खटपटीचे दृश्य फल आहे. पूर्णत्व पावावें हे या सर्व शास्त्रांचे साध्य आहे; आणि जीवात्म्याची सारी धडपडहि याच पूर्ण स्थितीच्या प्राप्तीकरितां-मुक्तीकरितां-आहे. केवळ सृष्टीकडे पाहिले तर तींतून मुक्तीचा मार्ग कोठेच आढळत नाही. सृष्टि चोहोंकडून नियमांनी जखडलेली. या नियमबद्ध रचनेत गुरफटल्यावर मुक्तीचा मार्ग कसा दिसणार ? पाहावे तिकडे नियम आणि कायदा यांचे साम्राज्य. पण नियम आणि कायदा यांचे साम्राज्य चोहोंकडे इतकें उघड रीतीने प्रत्ययास येत असतांहि हा कायदा उल्लंघन करण्याची जीवात्म्याची खटपट एकसारखी सुरू आहेच. चंद्र, सूर्य आणि ताऱ्यापासून तो गवताच्या पातीपर्यंत यच्चयावत् सृष्ट पदार्थ नियमांनी जखडलेले आहेत. मनुष्यप्राणीहि या सृष्टीतलाच असल्यामुळे सृष्टीच्या कायद्यांचा खोडा त्याच्याहि पायांत असला तर त्यांत नवल कसले ? पण छे, मनुष्यप्राण्याला ही गोष्ट अद्यापिहि पटत नाही. आज हजारों वर्षे मनुष्यप्राणी या कायद्यांचा मनःपूर्वक अभ्यास करीत असूनहि