पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

ज्या भावनांचें समवायीरूप आहे, त्यांपैकींच ईश्वराच्या अस्तित्वाची भावना हा एक घटक आहे. वेदांतमताप्रमाणे सच्चिदानंदरूपाची भावना ही परमेश्वराच्या अस्तित्वाच्या भावनेची अत्युच्च दशा आहे. परमेश्वराबद्दल जो कांहीं कल्पनासमूह आपल्या मनांत वास करीत असेल तो सर्व समूह सच्चिदानंद या एकाच पदाने व्यक्त होतो. आपली ईश्वरविषयक कल्पना कितीहि विस्तार पावली, तरी ती 'सच्चिदानंद' या स्वरूपापलीकडे जाऊ शकतच नाही, असें वेदांताचे मत आहे. सर्व ज्ञानाचा शेवट जेथें होतो व त्यामुळे निरामय आनंदाची प्राप्ति जेथें होते, असें तें सच्चिदानंदरूप आहे. आपण अनंतकालापासून आपल्या या मुक्त होण्याच्या इच्छेस दाबून धरीत आहों. सृष्टींत भासमान होणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमांस अनुसरण्यांत अधिक सुरक्षितपणा आहे, अशा भ्रमाने आपल्या अंतःकरणांत उत्पन्न होणाऱ्या भावनांचा कोंडमारा आपण आज अनंतकालापासून करीत आहों; तथापि आपल्या या कोंडमाऱ्यास न जुमानतां आपण मुक्त व्हावें ही भावना पुन:पुन: जोराने आपल्या मनांत उद्भवतेच. कार्यकारणांचा आणि सृष्टीच्या कायद्यांचा बंध उल्लंघून पलीकडे असलेल्या सच्चिदानंदपदास जावे अशी भावना पुन:पुनः आपल्याच चित्तांत येते. आपण कितीहि प्रयत्न केला तरी ही भावना उत्पन्न होण्याचे थांबत नाही. या भावनेचा वास्तविक अर्थ आपल्या ध्यानात येत नाही, तरी मानवी बुद्धीची व दैवी बुद्धीची अहमहमिका आपल्या हृदयांत आपणांस नकळतहि सुरू असतेच; व ही अहमहमिका-हें भांडण-सुरू असेपर्यंत, प्रत्येक मनुष्याचे निराळे अस्तित्व-व्यक्तित्व-शिल्लक असते. किंबहुना व्यक्तिविशिष्टत्व असणे हेच या भांडणाचे कार्य आहे. मानवीबुद्धि आपणांस दृश्य जगाबाहेर जाऊ न देण्याचा यत्न करीत असते व दैवीबुद्धीचा यत्न दृश्य जगाबाहेर नेण्याचा असतो. या दोहोंच्या तंट्याचें जें व्यक्तरूप तेच आपले विशिष्ट वैय्यक्तिक रूप होय.

 या जगांत आपण जन्मास आल्याबरोबर जो पहिलाच शब्द व्यक्त करता त्याचाहि अर्थ हाच. 'मी कायद्याने बांधला जाणार नाही; मी कायद्याच्या पलीकडचा आहे' हाच आपल्या पहिल्या ध्वनीचा वास्तविक अर्थ आहे. जापयत आपण ही सृष्टीची बंधनें पाळीत असतों, तोपर्यंत एखाद्या यंत्रापेक्षा आपली वास्तविक अधिक किंमत नसते. निर्जीव यंत्रांची सर्व हालचाल जशी त्याच्या कर्त्याच्या आधीन असते, तशीच आपली सर्व हालचाल सृष्टीच्या आधीन असते; व अनंतकालाच्या संवयीने आपणांस ही बंधनें फारशी जाचक वाटत नाहीत;