पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आपण त्याच कायद्याने बांधले आहों, ही गोष्ट त्यास अद्यापिहि पटत नाहीं; आणि पुढेहि पटणार नाही. अनंतकालापासून तो 'मुक्ति' हे एकच पालोपद गात बसला आहे. हे पद गात असतां त्याला साहजिकच असे वाटले की, या नियमांच्या बाहेरचा असा एखादा प्राणी असावा. हाच ईश्वरविषयक कल्पनेचा प्रारंभ आहे. आपण मुक्त व्हावें-गरजेच्या पलीकडे जावें-अशी प्रवृत्ति एकवार उद्भवली की ती कायमची राहणार. ही कल्पना प्रत्यक्ष सिद्ध करण्याकरितां ह्मणजे मुक्त होण्याकरितां मनुष्य जे श्रम करतो व जे कष्ट सहन करतो त्यांवरून त्याच्या अंतःकरणांत मुक्तीची लालसा किती जाज्वल्य आहे, याचा अजमास होतो. दुसऱ्या एखाद्या कार्यासाठी त्याने इतके कष्ट कधीहि सोसले नसते. आपण परिस्थितीचे पक्के गुलाम आहों, व सृष्टिनियमांच्या शृंखला आपल्या पायांत खळखळत आहेत, ही जाणीव अंतःकरणास वारंवार टोंचीत असतांहि त्याला असे वाटते, की या सृष्टीच्या कायद्याबाहेरचा असा कोणी तरी प्राणी असला पाहिजे. सृष्टिबंधनांचे दुःख अनुभवास येत असतांहि ईश्वरविषयक कल्पना त्याच्या चित्तास मोठा आधार देते. यावरून ज्याप्रमाणे सृष्टिनियमांची जाणीव ही एक अंतःकरणाचा घटक आहे, त्याचप्रमाणे त्या बंधनापलीकडे असणाऱ्या ईश्वराविषयींची कल्पना हा दुसरा घटक आहे. जेथे पहिल्या कल्पनेचे वास्तव्य असेल तेथे दुसरीहि तिच्या सोबतीने येणारच. मुक्तीसाठी सुरू असणाऱ्या धडपडीमुळेच वरील दोन्ही कल्पनांचा उदय झाला आहे. सर्व सजीव सृष्टीत मुक्तीच्या कल्पनेचा उदय कमीअधिक प्रमाणाने झालेला आहे. ही कल्पना उदित न झालेली अशी एखादी वनस्पतीहि सांपडणार नाही. झाडेझुडपें आणि लहानसहान कीटक यांमध्येहि या कल्पनेचा उदय स्पष्ट दिसतो. मनुष्यांमध्य मानवीबुद्धि आणि दैवीबुद्धि अशी बुद्धीची दोन स्वरूपं असतात व या दोन बुद्धींच्या द्वैतामुळे भांडणामुळे-मनुष्यांतला विशिष्टपणा कायम असतो अस उपाय सांगितले. त्याचप्रमाणे बुद्धीची ही द्विविध दशा अल्प प्रमाणाने, झाडेझुडप आणि क्षुद्र कीटक यांमध्ये असते; आणि त्यामळेंच मुक्तीच्या खटपटीबरोबर व्यक्तिविशिष्ट कायम ठेवण्याचीहि प्रवृत्ति प्राणिमात्रांत दिसून येते. गरजेच्या पलीकड जाण्यासाठी क्षुद्र कीटकहि प्रयत्न करीत असतात, हे आपल्या अनुभवांतले आहे. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीने त्यांची स्थिति फारशी स्पृहणीय नसतांहि त्या क्षुद्र देहास ते किती चिकटून असतात, हेहि प्रत्यही आपल्या अनुभवास येते. गरजेच्या पलीकडे जाण्याची खटपट ही दैवीबुद्धीच्या अल्प उदयाचे द्योतक असून