पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१६५

करण्यांत ते गुंतलेले असते असे आढळून येईल. आपल्यापासून गुप्त असें जगांत कांही असूच नये कशी आपल्या मनाची इच्छा असते. अशी भावना केवळ रानटी लोकांतच अधिक आढळून येते असें कोणी ह्मणेल; पण त्यावर आमचा उलट प्रश्न असा आहे की, त्यांच्या हृदयांत तरी ही भावना आली कोठून ? परमेश्वराने एखादा मोठा चमत्कार घडवून स्वर्गलोकींचें सुख आह्मांस याच लोकी द्यावे अशी यहुदी लोकांची इच्छा होती. या गोष्टीस कित्येक शतकें लोटून गेली, तरी तेव्हांपासून सर्व जगहि वस्तुतः हीच इच्छा करीत आहे. हीच गोष्ट अतृप्ततेसहि लागू पडते. जगाच्या आरंभापासून आजतागाईत सर्व अतृप्त असल्याचा प्रत्यय येतो. अमुक एक गोष्ट सिद्ध झाली की आपली तृप्ति होईल, अशा कल्पनेने आपण एखाद्या उद्योगास सुरवात करितो; परंतु आपले काम अर्धेमुर्धे झालें न झालें तों तिसरीच एखादी इच्छा उत्पन्न होऊन अतृप्ति पुनः पहिल्या इतकीच ताजीतवानी असल्याचे आढळून येते, आणि आपले पहिले सारे बेत ढांसळून पुन्हां नव्या उद्योगास आरंभ करावासें वाटू लागते. अमुक एक गोष्ट हवीशी वाटली की तिच्या प्राप्तीकरितां आपण निकराचे प्रयत्न करितो; परंतु ती गोष्ट अंशतः साध्य झाल्याबरोबर तिचा नाद सुटून ती नकोशी वाढू लागते व आपले मन आणखी एखाद्या निराळ्याच गोष्टीकडे वेधले जाते. आपल्या साऱ्या जन्माचा अनुभव आपण चाळून पाहिला तर त्यांत अतृप्तीशिवाय दुसरें कांहीसुद्धां आपणांस आढळून यावयाचे नाही. कशाचीहि आपणांस गरज नाही, असा क्षण आपल्या साऱ्या आयुष्यांत आढळून येणार नाही. या भावनेचे स्वरूप कधीं कमी उघड तर कधी अधिक उघड असते. साऱ्या जगभर जी ही स्थिति आढठून येते ती कां ? सर्व मानवजाति मुक्त होण्याकरितां-गरजेच्या पलीकडे जाण्याकरितां-एकसारखी धडपड करीत आहे, हेच या स्थितीचे कारण आहे. मानवी जीविताचा हाच प्रधान हेतु आहे. मूल जन्मास आल्याबरोबर 'कोऽहं' असा टाहो फोडिते. देहबंधनांत सांपडल्याचे त्यास झालेले दुःख तें रडून व्यक्त करतें. आपण स्वतंत्र व्हावें-मुक्त व्हावें-या भावनेपासून सर्वथैव मुक्त असा कोणी प्राणी असावा ही कल्पना ओघानेच उदयास आली. आपण मुक्त व्हावे, स्वतंत्र व्हावें, गरजेच्या पलीकडे जावें या भावनेच्या अत्यंत साहचर्याने असणारी दुसरी भावना ह्मणजे असा मुक्त प्राणी कोणी तरी असावा हीच आहे. या दोन भावना अत्यंत निकटवर्ती आहेत. यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना मानवी हृदयांत निरंतरची वास करून राहिली आहे. मनुष्याचे अंतःकरण हे