पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

पूर्ण मुभा आहे. एंजिन कितीहि मोठे असले तरी त्याच्या ठिकाणी बुद्धि नसल्यामुळे ते केवळ परतंत्र आहे. सजीव प्राण्याच्या ठिकाणी स्वतंत्र होण्याची जी इच्छा दिसून येते, त्या स्वातंत्र्यासाठी-मुक्तीसाठी-आमची सारी धडपड चाललेली आहे. हल्लींच्या स्थितीहून अधिक स्वातंत्र्याची स्थिति कशी प्राप्त होईल या विचारांत आपण सर्व गढलों असून बुद्धिदर्शित मार्गाने चालू असलेले आपले सर्व प्रयत्नहि याच साध्याच्या प्राप्तीकरितां आहेत. पूर्णपणे स्वतंत्र होणे-मुक्त होणे ह्मणजेच पूर्णत्व पावणे होय. पूजनाचे जे जे विधि व आचार आज जगांत दिसून येतात, त्यांच्या मुळाशी हीच इच्छा ग्रथित झालेली आहे. आपलें साध्य मुक्ति हे आहे, ही गोष्ट कोणास समजत असेल अथवा कोणास समजत नसेल, पण प्रत्येकाचे प्रयत्न मात्र त्याच दिशेने चालू आहेत, ही गोष्ट निश्चित आहे.

 जगावर चालू असलेले पूजाविधि पाहिले तर रानटी स्थितीतील लोक, भुतेंखेतें, राक्षस अथवा स्वतःच्या पूर्वजांचे आत्मे यांचे पूजन करीत असल्याचे आढळून येते. सर्पपूजा, आपल्या टोळीच्या मुख्य देवाची पूजा अथवा पूर्वजांच्या आत्म्याची पूजा ते कां करितात ? कांहीं गुप्त कारणांनी भूतपिशाचांना आपणापेक्षा अधिक सामर्थ्य असते आणि आपले सध्याचे स्वातंत्र्यहि हिरावून घेण्याची शक्ति त्यांस आहे, अशी त्यांची भावना असते. यासाठी त्यांना खुष ठेवलें ह्मणजे त्यांजपासून आपणांस कांहीं अडथळा होणार नाही, असा त्यांचा साहजिक समज असतो. तसेच त्यांची मदत मिळाली तर स्वतः फारसे श्रम न करितां आपणांस जरूर असलेल्या वस्तु मिळतात, असाहि त्यांचा समज असतो. या भावनांचे पृथक्करण केले तर त्यांच्या मुळाशी प्रथम सांगितलेली स्वातंत्र्याची लालसा हीच आढळून येते. स्वतःस फारसे श्रम करावे न लागतां आपणांस जरूर असलेल्या वस्तु मिळाल्या ह्मणजे गरजा भागून आपण अधिक स्वतंत्र होऊ असा या भावनांचा तात्विक अर्थ आहे.

 कोणाची तरी स्तुति केली अथवा पूजा केली तर तो आपणास अनपेक्षित अशी मदत करील-एखादा चमत्कार करील अशी भावना मानवहृदयात सर्वत्र आढळून येते. कोठून तरी बाहेरून मदत मिळण्याची आशा आपल्या हृदयातून सर्वथव नष्ट अशी कधीच होत नाही. आपण केवढाहि अट्टहास केला, तरी ही भावना कोणत्याना कोणत्या रूपाने आपल्या हृदयांत घर करून राहतेच; इतकी तिची चिकाटी विलक्षण आहे. फार लांब कशाला, आपण आपल्या मनावर उठणाऱ्या नानाविध तरंगांचे पृथक्करण केले तर जगाचें अंतःस्वरूप-गुप्तरूप-काय आहे याचा विचार