पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धर्म म्हणजे काय ?

 आगगाडीच्या रुळांवरून एक प्रचंड एंजिन झपाट्याने धावून येत आहे. त्यांपैकी एका रुळावर एक अगदी लहानसा किडा बसला आहे. एंजिन जवळ येऊ लागल्याबरोबर त्याची जाणीव त्या किड्याला होते आणि रुळावरून बाजूला सरपटून तो आपला प्राण वाचवितो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या नेहमी पाहण्यांत येतात. तो किडा पाहिला तर किती लहानसा प्राणी ! एखाद्या लहानशा आघातानेंहि बिचारा मरून जावयाचा. तें एंजिन पाहिले तर केवढें अजस्र. त्याचे शरीर आणि शक्ति एखाद्या राक्षसासारखी विशाल! परंतु एंजिन कितीहि मोठे आणि शक्तिमान् असले तरी तें जड इंजिन; आणि किडा कितीहि सूक्ष्म असला तरी तो जिवंत प्राणी. त्या एंजिनाचा लहानसा धक्का त्या किड्याला लागता, तर त्या किड्याचा मागमूसहि या सृष्टीत राहिला नसता! असें आहे तरी आपल्या दृष्टीने त्या किड्याची योग्यता त्या राक्षसी एंजिनापेक्षा अधिक आहे. कारण किडा कितीहि सूक्ष्म असला तरी अनंत चैतन्याचा तो एक स्फुलिंग आहे. अनंत चैतन्य त्या सूक्ष्म देहांत अंशतः प्रकट झाले आहे. एका दृष्टीने पाहिले तर एंजिनहि जिवंत प्राण्याप्रमाणे हालचाल करिते. मग त्याच्या हालचालींत आणि त्या किड्याच्या हालचालींत फरक आहे, ही भावना आपल्या ठिकाणी कोठून येते ? हालचाल करणारा एवढासा किडा, तशीच हालचाल करणाऱ्या प्रचंड एंजिनाहून आपणांस मोठा वाटतो तें कां ? एंजिनाने कितीहि हालचाल केली तरी तें मृत आहे-जड आहे-असे आपण ह्मणतो. किडा कितीहि लहान असला तरी तो जिवंत प्राणी आहे असे आपल्या मनांत येतें. दोहोंच्या हालचाली पाहून आपल्या मनांत अगदी विरुद्ध भावना उत्पन्न होतात त्या कां, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे कारण असे आहे की एंजिनाने कितीहि हालचाल केली, तरी ती हालचाल मर्यादित आहे. एंजिन बनविणाराने जें कांही सामर्थ्य त्या एंजिनाच्या अंगी ठेविले असेल, त्या मर्यादेचे उल्लंघन तें कधीहि करूं शकणार नाही. परंतु जिवंत प्राण्याची गोष्ट याहून वेगळी आहे. हालचाल कोणत्या प्रकारची व किती करावी हे ठरविण्याची त्याला पूर्ण स्वतंत्रता आहे. त्याने अमुक मर्यादेतच राहिले पाहिजे अशी जबरी त्यावर कोणी करूं शकत नाही. त्याच्या ठिकाणी उदित झालेल्या बुद्धीचा उपयोग करण्याची त्याला