पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

अथवा आत्म्याच्या स्वरूपाविषयी तुमच्या अनेक प्रकारच्या उपपत्ति ऐकण्याची माझी इच्छा नाही. परमेश्वर असला अथवा नसला तरी त्यामुळे माझ्या दानतीवर बरावाईट परिणाम काय होणार आहे ? असले तुषकंडन करून कालक्षेप करण्यापेक्षा सन्मार्गवर्ति होण्यांत गेलेला वेळ सत्कार्थी तरी लागेल. स्वतःच्या सुखाची यत्किचिहि पर्वा न करतां परोपकारार्थ कर्म करा, ह्मणजे सत्य ह्मणून जे काय असेल, त्याची तुह्मांस प्रत्यक्ष भेट होऊन तुह्मी मुक्त व्हाल." त्याच्या एकंदर जीवितयात्रेत स्वतःच्या सुखाबद्दलचा विचार त्यास शिवलासुद्धा नाही. त्याचे चित्त इतकें अहेतुक असतांहि त्याने केलेल्या कार्याचा शतांशहि इतर कोणी करून दाखविल्याचे आढळत नाही. जगाच्या इतिहासांत इतक्या अनासक्त चित्ताने एवढा मोठा कार्यभाग केल्याचे दुसरें एकहि उदाहरण आपणांस सांपडणार नाही. पृथ्वीवर मनुष्यजात अस्तित्वात आल्यापासून 'अनामिका सार्थवती' करणारे असे हे एकच नररत्न आजपर्यंत उदयास आलें. केवळ परार्थचिंतन, निःसीम त्याग आणि अत्यंत निरपेक्षबुद्धि यांचा मनोहर संयोग इतर कोठेहि तुह्मांस आढळणार नाही. अत्यंत उच्चप्रतीचे तत्वज्ञान सांगत असतां नीचतम प्राण्याबद्दलहि अत्यंत कळकळ त्याच्या अंतःकरणांत वास करीत होती. 'मी' आणि 'माझें' या शब्दांचे अर्थहि तो विसरला होता. कर्मयोगाचा शुद्ध आदर्श पहावयाचा असेल तर तुह्मी बुद्धाकडे पहा. अहंकाराची छटासुद्धा त्याच्या हृदयांत नव्हती. बुद्धि आणि अंतःकरण या दोहोंचीहि परिपक्क दशा एकत्र कोठे पाहणे असेल तर बुद्धावांचून ती दुसऱ्या कोठेहि आढळणार नाही. जीवात्म्याचे याहून अधिक उज्वल असें रूप दुसऱ्या कोठेहि सांपडणार नाही. मनुष्यजात सन्मार्गवर्ति व्हावी एवढ्याचसाठी खटपट करणारा असा हा पहिला महात्मा होय. एके वेळी तो आपल्या शिष्यांस ह्मणाला, “अमुक गोष्ट अमक्या जुन्या ग्रंथांत सांगितली आहे, एवढ्यावरूनच ती सत्य ह्मणून गृहीत धरूं नका. तुमचे आप्तइष्ट अमुक गोष्ट खरी मानतात, एवढ्यावरूनच ती तुझी खरी मानूं नका. लहानपणापासून वडिलांनी अमुक गोष्ट सांगितली, एवढ्यावरूनच तुह्मी ती खरी मानूं नका. जें जें तुह्मी ऐकाल तें तें सर्व आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घांसून पहा. जर तें उत्तम ठरले तर तें खरें माना, त्याचा प्रत्यक्ष आचार करा; इतरांस तें सांगा आणि तसे करण्यास इतरांस मदत करा.” 'जुनें तें सोने' असें ह्मणण्याची साऱ्या जगाची प्रवृत्ति असतां त्या प्रवृत्तीविरुद्ध उघडपणे उपदेश करणारा वीर किती निधड्या छातीचा असला पाहिजे, याचा तुह्मीच विचार करा.