पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

तें आमचे खरे स्वरूप-मूळरूप-नाही. आमचे खरे रूप ह्मणजे सच्चिदानंदरूप हेच आहे. आह्मी कर्म करतांना आढळलों, तरी वस्तुतः आह्मी काहीच करीत नाही. असें आहे तर, आह्मी सध्याचा बंदिवास कां भोगावा ? या बंदिवासांतून मुक्त होण्याचा राजमार्ग एकच आहे. अत्यंत अनासक्त चित्ताने केलेले प्रत्येक कर्म आमच्या पायांतील शृंखलेचा एक एक दुवा तोडीत असते. चित्त अनासक्त असतां त्यांतून एखादाहि शुभ विचार निघून जगांत संचार करूं लागला तर त्या विचारालाहि असला एखादा दुवा तोडण्याचे सामर्थ्य येते; व अशा रीतीने शुद्धीकरणाची क्रिया पूर्ण होऊन आह्मी अत्यंत पवित्र बनतो. आतांपर्यंत केलेले सर्व विवेचन इतकें उघड असतांहि निव्वळ वेड्याची बडबड आहे, असे समजणारे वेडेपीर अस्तित्वांत आहेत. कर्मयोग हा निवळ बोलण्याचा विषय असून तो कृतींत येणे अशक्य आहे, असें ह्मणणारे अनेक लोक माझ्या पाहण्यांत आले आहेत. काही तरी हेतु असल्याशिवाय मनुष्याच्या हातून कोणतेंहि कर्म घडणे शक्य नाही व यासाठी गीताप्रतिपादित मार्ग दिसण्यास चांगला दिसला, तरी तो सर्वथा अव्यवहार्य आहे, असें ह्मणणारे अनेक लोक मला भेटले. परंतु यांतील तात्पर्य इतकेंच की, अनासक्तचित्ताने कर्मे करणारे कर्मयोगी त्यांच्या पाहण्यांत आले नसल्याने ते असें बोलतात. केवळ परोपकारार्थ कर्म करणे ही गोष्ट धर्मवेड्यासच शक्य आहे, असे त्यांस वाटते.

 कर्मयोगाने दाखविलेला मार्ग पूर्ण व्यवहार्य आहे, ही गोष्ट भगवान् बुद्धानें तो मार्ग स्वतः पूर्णपणे आचरून प्रत्यक्ष सिद्ध करून दाखविली आहे. कर्मयोगाचा आचार प्रत्यक्ष करून दाखविणारा असा हा एकच महात्मा या भूतलावर झाला. जगांत आजपर्यंत जितके धर्मप्रवर्तक झाले, त्यांच्या चरितांत कोणताना कोणता तरी हेतु प्रधान होता. अगदी अहेतुक असें चरित एकट्या बुद्धाचेंच आहे. बुद्धाखेरीज जितके धर्मप्रवर्तक होऊन गेले, त्यांत मुख्यतः दोन प्रकार आढळतात. आपण प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहों असें कांहीं प्रवर्तक ह्मणत, हा एक प्रकार; आणि आपण परमेश्वराचे केवळ दूत असून त्याचा संदेश मनुष्यजातीस पोहोचवावयाचा हे आपले काम आहे, असें ह्मणणारे प्रवर्तक हे दुसऱ्या प्रकारचे होत. या प्रकारचे प्रवर्तक कितीहि उच्च दर्जाचे असले व त्यांची धर्मबुद्धि कितीहि श्रेष्ठ असली, तरी त्यांची कर्मे अगदी अनासक्त चित्ताने केलेली होती असें ह्मणवत नाही. कसल्या तरी प्रतिफलाची अपेक्षा त्यांस होतीच. एका वादविवादाचे प्रसंगी भगवान् बुद्ध ह्मणाला, “ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल