पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

लुला नाही, ही गोष्ट ते केव्हांहि विसरत नाहीत. जग जसें चालले आहे तसें चालणारच. आपले काम मुक्ति मिळविण्याचे आहे, आणि अत्यंत नि:स्वार्थी होणे हा मुक्तीचा मार्ग आहे. कर्म करीत असतांच नि:स्वार्थी होणे आणि निःस्वार्थी होऊन मुक्ति मिळविणे यालाच कर्मयोग ह्मणतात. जगाला सुखी करण्याची ही कल्पना धर्मवेड्या लोकांना कार्यरत ठेवण्यास उपयोगी पडते ही गोष्ट खरी, पण धर्मवेडापासून जसे काही चांगले कार्य होते, तसेच अनेक अहितकर भावना त्यापासून निर्माण होतात, ही गोष्टहि खरी आहे. आपण मुक्त व्हावे अशी जी लालसा प्रत्येक वस्तूंत आढळते, तिला अनुसरून वस्तुमात्र प्रयत्न करीतच असते. ही इच्छा इतकी बलवती आहे की, ती तुह्मांस स्वस्थ बसू देणारच नाही. मग कर्मास प्रवृत्त करण्यास बाहेरील एखाद्या शक्तीची अपेक्षा का असावी, असा आपणांस कर्मयोगाचा प्रश्न आहे. 'मी अमुक करीन आणि त्याचे तमुक फल भोगीन' इत्यादि लौकिक विचार झुगारून देऊन फलासक्ति न ठेवतां कर्म करा. सतत अभ्यासाने हे सर्व साध्य होण्याजोगे आहे असें कर्मयोगाचे सांगणे आहे. स्वतःच्या इंद्रियजन्य सुखार्थ कर्म करावयाचे नाही, अशा भावनेनेच कर्म करण्याचा अभ्यास सुरू केला, ह्मणजे स्वार्थाचा समूळ लोप होऊन, परार्थ हाच कर्त्याच्या जीविताचा एक घटक होऊन बसतो. आपल्या हातून परार्थ न घडेल तर जगणेहि योग्य नाही, इतकी उत्कट भावना त्याच्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागते. असें आहे तर कार्यरत राहण्यास चालकशक्ति बाहेरून येण्याची अपेक्षा कां करावी ? अमुक कार्य चांगले आहे असे आपणांस वाटले, तर तें करण्यास आपली सदोदित तयारी असली पाहिजे. त्यांत स्वतःच्या सुखाची अपेक्षा मुळीच असतां कामा नये. इहलौकिक सुखाची अपेक्षा तर राहोच, परंतु स्वर्गसुखाच्या अपेक्षेने केलेले सत्कर्मसुद्धां आत्म्यास बद्धक होते. स्वार्थांची यत्किचिहि छटा शिल्लक असेपर्यंत केलेले प्रत्येक कर्म मुक्तिपथापासून आपणांस दूर ठेवतें; येवढेच नव्हे, तर आपणाभोंवतीं अगोदरच असलेल्या शृंखलेत त्या कर्माच्या योगाने आणखी एका दुव्याची भर पडते.

 यासाठी कर्मयोगाचे त्रिवार सांगणे हेच आहे की, प्रत्येकाने कर्म करीत असतां फलाची आसक्ति ठेवू नये. जग हे आमच्यासाठी उत्पन्न झाले नाहीं; अथवा आम्हीही जगासाठी उत्पन्न झालों नाही. कोणी कोणाचे बरें 'अगर वाईट करूं शकत नाही. तसेंच बाह्यशरीरावरून दिसून येतें तें आमचे स्वरूप नव्हे. अनेक कर्मे करून फळे भोगतांना जरी आह्मी दिसलों, तरी