पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

अनुरूप असा हेतु उत्पन्न होतो व त्या हेतूस अनुसरून मनुष्य कर्मास प्रवृत्त होतो. जगाला जोपर्यंत अस्तित्व आहे, तोपर्यंत हे दोन्ही प्रकार कायम राहणारच व हे दोन्ही प्रकार कायम आहेत तोपर्यंतच जगाला अस्तित्व असणार; असा हा परस्परावलंबी संबंध आहे.

 या प्रचंड संसारचक्राच्या पोटांत इतर अनेक चक्रांची इतकी भयंकर गुंतागुंत आहे की, आपला हात त्यांत कोठेहि एकवेळ गुंतला, की ही चक्रे आपणांस आंत ओढून शुष्क करून टाकण्यास चुकत नाहीत. आपण एखाद्या कर्मास प्रवृत्त झालों, ह्मणजे तें कर्म संपल्याबरोबर आपणांस विश्रांति मिळेल अशी आपली अपेक्षा असते. परंतु आपल्या हातचे कर्म अर्धवट झाले न झालें तोंच आपल्या पाठीशी दुसरें कर्म दत्त ह्मणून उभे राहते. आज आपण सर्वजण या प्रचंड चक्राच्या सपाट्यांत सांपडलो आहों. यांतून सुटण्यास आपणास दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग असा आहे की या चक्राशी आपला काही संबंधच येऊ द्यावयाचा नाही. ह्मणजे सर्व वासनांचा त्याग एका क्षणींच करावयाचा. सांगतांना हे फार सोपे वाटते, पण करणे मात्र जवळ जवळ अशक्य आहे. " बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ।' हा अनुभव कोणास नाही ? कोट्यवधि मनुष्यांत असा एखादा असला तर असेल. दुसरा मार्ग हा की, या चक्रांच्या भेसूर स्वरूपाला न भितां एकदम त्यांत उडी घालावयाची व ती कशी फिरतात, कशाच्या जोरावर फिरतात आणि मधूनच त्यांतून निसटण्यास कोठे रस्ते आहेत की काय, इत्यादि रहस्याचा शोध करावयाचा. हे रहस्य सांपडले की, चक्रांचे धनीपण आपणांस प्राप्त होते. हेच रहस्य आपल्या स्वाधीन करणे, हा कर्मयोगाचा उद्देश आहे. या चक्रव्यूहाला भिऊन पळून जाऊ नका. पळून जाऊन रक्षण होणे शक्य नाही. तर मग निधड्या छातीने एकदम आंत शिरून बाले किल्ला हस्तगत करा, ह्मणजे तुमचे काम झाले. या कामास फार चातुर्याने हात घातला पाहिजे. आंत शिरून योग्य मार्गाने तुह्मीं गेलां, तर सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्गहि तुह्मांस आपोआप दिसेल.

 कर्म ह्मणजे काय याचा विचार आपण पूर्वी एक वेळ केलाच आहे. जगाचे अस्तित्वच कर्मावर अवलंबून आहे हेहि आपणांस समजून आले आहे. तसेच जगाला सुखी करूं पाहणें हें मुर्खपणाचें व सर्वथैव अशक्य आहे, हेहि आपणांस कळून आले आहे. अंत:करणापासून ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांचा खरा विश्वास असतो त्यांस हे लवकर पटते. आपल्या मदतीची अपेक्षा करण्याइतका परमेश्वर लंगडा