पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

गर्भावस्थेतून बाहेर येऊन आपण जगांत वावरूं लागलों मणजे बुद्धीच्या कमी अधिकपणास दृश्य स्वरूप येऊ लागते. बुद्धीचा कमी अधिकपणा नाहीसा करणे शक्य आहे काय ? तुमच्या या देशांत ( अमेरिकेंत) मूळचे लोक-ज्यांना तुह्मी इंडियन लोक ह्मणतां-हजारों वर्षे राहत होते. त्यानंतर तुमचे मूठभर पूर्वज येथे आले. त्यावेळची स्थिति पाहिलेला एखादा मनुष्य सध्या येथे आला, तर त्यावेळच्या आणि सध्यांच्या स्थितीत त्यास जमीनअस्मानाचे अंतर दिसून येईल. पूर्वीचा देश तो हाच, ही गोष्ट त्यास खरीहि वाटणार नाही. अमेरिकन इंडियन लोकांनी हजारों वर्षे या देशांत राहून एखादें तरी शहर वसविलें होतें काय ? एखादा कारखाना तरी त्यांनी उभारला काय ? त्यांनी असें कां केलें नाही ? जन्मतः सर्वांच्या बुद्धीचे प्रमाण जर एकसारखें आहे, तर तुमच्या मूठभर पूर्वजांनी जी गोष्ट थोड्याशा अवधींत करून दाखविली तीच हजारों वर्षे वस्ती करून राहिलेल्या हजारों इंडियनांस कां करितां आली नाहीं बरें ? तुमच्या पूर्वजांबरोबर या भूमीत आलेली बुद्धिमत्ता निराळ्या प्रकारची होती. त्यांचे निराळे पूर्वसंस्कार त्यांजबरोबर आले होते; व येथें अनुकूल भूमि सांपडतांच त्या संस्कारांस दृश्यस्वरूप येऊन झोंपड्यांची इंद्रभुवनें आणि वनांची उपवनें बनली. सर्वत्र समावस्था ह्मणजे मृत्यूचे साम्राज्यच होय ! जोपर्यंत जग आहे तसेंच चालेल, तोपर्यंत त्यांतील विषमावस्था कधीहि नाहीशी होणार नाही, आणि सर्वत्र समता उत्पन्न करून जगाला सुखी करण्याचा आपला प्रयत्न प्रलयकाली मात्र सिद्ध होईल ! प्रलयकालावांचून इतर कोणत्याहि काली समावस्था शक्य नाही. असें आहे तरी सुद्धा या कल्पनेने प्रेरित असे महत्वाचे अनेक उद्योग सुरू आहेत, ही गोष्ट विसरता कामा नये. जग दृश्यस्वरूपास येण्यास ज्याप्रमाणे असमतेची जरूर आहे, त्याचप्रमाणे ती असमता अधिक होऊ नये अशा प्रयत्नांचीहि जगाच्या स्थितीस जरूर आहे. अशा मार्गानी प्रयत्न करून मनुष्य आपल्या मूळच्या सच्चिदानंदस्वरूपास परत जातो. आपल्या मूळच्या स्वरूपास परत जाण्याची इच्छा न उद्भवती तरीसुद्धां जगाला दृश्यस्वरूप प्राप्त झाले नसतें. ह्मणजे जग दृश्यस्वरूपास येण्यास व त्याची स्थिति कायम राहण्यास, पूर्वस्वरूपास परत जाण्याची इच्छा आणि असमता या दोहोंचीहि सारखीच आवश्यकता आहे. याकरितां जगाची स्थिति बदलण्याचा यत्न करणारे आणि ती स्थिति कायम ठेवू पाहणारे अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यांची जगास जरूर आहे. या दोहोंपैकी जी एक इच्छा अंतःकरणांत प्रबळ असते तिला