पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

करतो. सर्व बिंदु एकमेकांच्या आश्रयानें पूर्वस्थिति प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करीत असतात. त्याच प्रमाणे या विश्वांतील यच्चयावत् पदार्थ आपल्या पूर्वीच्या समानावस्थेस जाण्याकरितां धडपडत आहेत. अशी समानावस्था प्राप्त होते न होते तोच पुन्हां एखादा आघात होऊन तो समानावस्थेचा विघाड करतो व जग पुन्हां दृश्यावस्थेस येते. यावरून असमानावस्था हेच जगाच्या दृश्यस्वरूपाचे आदिकारण आहे असे सिद्ध होते. तसेच जग दृश्यस्वरूपास येण्याकरितां आघाताची जशी जरूर आहे, त्याचप्रमाणे त्याकारितां समावस्थेस जाऊ पाहणाऱ्या गुणांचीहि आवश्यकता आहे.

 यावरून गुणत्रयाची सर्वत्र समता उत्पन्न झाल्याशिवाय जगांत समानता उत्पन्न होणे ही गोष्ट अगदी अशक्य कोटींतली आहे, हे सिद्ध झाले. गुणत्रयाची समावस्था सर्वत्र आणि एकाच काली उत्पन्न होईल ही गोष्ट शक्य नाही. गुणत्रयाची समावस्था उत्पन्न होऊ लागली तर त्यावेळी जगांत सध्या असलेले सर्व पदार्थ निराळ्या स्थितींत जाऊ लागतील. ज्या दोन वायूंचे पाणी बनले आहे, त्यांतील गडबड बंद झाली ह्मणजे पाण्याचे अस्तित्व नाहीसे होईल. अशा रीतीनें पदार्थमात्राचे रूपांतर होऊ लागले ह्मणजे आपणा मनुष्यांस जीव धारण करणे शक्य आहे काय? ह्मणजे ज्या काली पदार्थमात्रांत समता उत्पन्न होईल, त्याच क्षणी हे जग आपणांस राहावयास अयोग्य होऊन जग ह्मणजे एक मोठी स्मशानभूमि होऊन राहील ! स्मशानांत मात्र खरी समता असते, हे आपण नित्य पाहत आहोंच ! या एकंदर विवेचनावरून सर्वत्र समता आणि बंधुभाव उत्पन्न करण्याचे आपले प्रयत्न किती बालिशतेचे आहेत, हे आपल्या लक्ष्यांत आलेंच असेल. हे प्रयत्न केवळ बालिशतेचे आहेत येवढेच नव्हे, तर ते फलद्रूप करण्याच्या प्रयत्नांत आपणांस यश आलेच तर त्याच दिवशी प्रलयकाल सुरू होईल ! मनुष्यांमनुष्यांत जो फरक आढळतो त्याचे कारण काय ? दोन मनुष्यांच्या मेंदूत जो फरक असतो तोच पुढील अवस्थेत असमता उत्पन्न करतो, असें ह्मणणे वावगे होणार नाही. एकाच दिवशी जन्मलेली चार मुले आपण पाहिली तरी त्यांच्या मेंदूत फरक असतोच, असे शास्त्रज्ञ आपणांस सांगतात. सर्व मनुष्यांचे मेंदु सारख्याच शक्तीचे असतात, असें निवळ वेड्यावांचून सध्याच्या काली तरी कोणी ह्मणणार नाही. आपण ज्या शस्त्रास्त्रांनी सिद्ध होऊन या जगांत अवतरतो त्या शस्त्रास्त्रांत आरंभीच फरक असतो. हा फरक गर्भावस्थेतच उत्पन्न झालेला असतो.