पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

माणूस सध्याच्या काळी फारसा आढळावयाचा नाही. यामुळे पूर्व कालींच्या या समतेच्या तत्वाचे थोडेसें रूपांतर झाले आहे. या रूपांतराचे समानार्थक असे स्वातंत्र्य आणि बंधुभाव हे शब्द आतां जिकडे तिकडे ऐकू येतात. व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य इत्यादि प्रकारची अनेक स्वातंत्र्य मिळाली व परमेश्वर सर्व मनुष्यांचा पिता ही कल्पना एकसमयावच्छेदेंकरून सर्वांस पटली ह्मणजे सर्वत्र समता उत्पन्न होऊन जग सुखी होईल, असा घोष सध्या ऐकू येतो. परंतु हाहि दुसऱ्या प्रकारचा वेडेपणाच आहे. पूर्वीचें धर्मवेड जाऊन त्या जागी हे नवें वेड आले, इतकेंच. खरी समता या पृथ्वीवर पूर्वी केव्हांहि नव्हती, सध्या ' नाही, आणि पुढेहि कधी होणार नाही. सर्वांची स्थिति एकसारखी असणे ही गोष्ट शक्य कोटीतील तरी आहे काय ? राजा आणि रंक यांस जेथें एकसारखाच मान मिळतो असें ठिकाण या पृथ्वीवर एकच आहे. ते ठिकाण कोणतें ह्मणाल तर स्मशान ! सर्वत्र समता उत्पन्न करण्याकरितां सर्व जगाचें स्मशानभूमीत रूपांतर करावे लागेल ! जग ज्या स्वरूपाने आपणांस भासत आहे तें रूप त्यास कां प्राप्त झाले, याचा प्रथम विचार केला पाहिजे. सृष्टिमालिकांपैकी आपल्या या एका सृष्टीचा आपण विचार केला, तर अगदी आरंभी ह्मणजे प्रलयकाली जगाचें रूप सध्या आहे तसे नव्हतें असें आपणांस दिसून येईल. त्यावेळी सर्व तत्वें एका महत्तत्वांत लीन होती व जगाला दृश्य स्वरूप नव्हते. अग्नि जसा गारगोटीच्या पोटीं लीनावस्थेत असतां अदृश्य असतो त्याचप्रमाणे जगाची अवस्था होती. ज्या त्रिगुणांच्या साहाय्याने हे जग दृश्य स्थितीस आले आहे, ते तीन गुण ह्मणजे सत्व, रज आणि तम, हे समसमान स्थितींत होते. ह्यांची जी समावस्था ती जगाची लीन अथवा अदृश्य स्थिति होय. जेव्हां या समावस्थेचा भंग होतो, जेव्हां या त्रिगुणांत असमान स्थिति उत्पन्न होते, तेव्हां जग दृश्य होते. ह्मणजे जग दृश्य होण्याकरितां या गुणांत असमानावस्था उत्पन्न व्हावी लागते असे सिद्ध होते. या गुणत्रयांत चढाओढ आणि अहमहमिका सुरू झाली ह्मणजेच जग दृश्य होते. चढाओढीबरोबर कमी अधिकपणा अवश्य येणारच. ज्या अणुरेणूंचें हें जग बनले आहे त्या अणुरेणूंतील चळवळ बंद होऊन त्याची समावस्था झाली तर काय होईल ? अशावेळी त्यातून कशाचाहि उत्पत्ति होणे शक्य नाही. आपल्या भौतिक शास्त्रांनी ही गोष्ट प्रत्यक्ष सिद्ध केली आहे. एखाद्या भांड्यांत शांत असलेले पाणी आपण हाताने ढवळले तर त्या पाण्यांतील प्रत्येक बिंदु आपली पूर्वीची समता प्राप्त करून घेण्यासाठी धडपड