पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१५३

नवल नाही. परंतु वृद्ध राष्ट्राची स्थिति याहून निराळी आहे. अनेक शतकें निरनिराळ्या परिस्थितींचा अनुभव येऊन त्याच्या वृत्तीत नैराश्यवादाचा प्रवेश झालेला असतो. 'हजार वर्षे शहर आणि हजार वर्षे रान' अशा अर्थाची एक ह्मण आहे. ही ह्मण साऱ्या जगाच्या स्थितीस लागू आहे. आज वैभवाच्या शिखरावर असलेली राष्ट्र उद्या धुळीस मिळतात! आणि आज अत्यंत अवनतावस्थेतला समाज उद्या प्रगतीच्या उच्च शिखरावर आरूढ झालेला दिसतो. अशा रीतीने परिस्थितीत बदल होत असतां ज्याच्या नजरेस जी परिस्थिति येते तिच्याकडे पाहून तो आशावादी अथवा निराशावादी बनतो. पण अशा अदलाबदलीमुळे जगाच्या सामान्यरूपांत काही बदल होत नाही. जगांतील दुःखें. नाहीशी करूं पाहणारांच्या मतांपैकी एकाचा विचार येथवर केला.

 अशा लोकांचे दुसरे एक तत्व समता हे आहे. जगांतील विषमावस्था हे त्याच्या दु:खाचे एक मोठे कारण असून ती नाहीशी होऊन सर्वत्र समता नांदूं लागली तर जग सुखी होईल, असें या लोकांचे दुसरें तत्व आहे. सर्व जगाला सुखी करण्याची इच्छा करणे ही कल्पना एका दृष्टीने प्रशंसनीय आहे. केवळ याच कल्पनेने प्रेरित असे अनेक उद्योग चालू असल्याचे आपल्या पाहण्यांत येते. हिच्या अभावी ही कार्ये सुरू झाली नसती. सर्व मानवजातींत समता उत्पन्न करणे हे आपल्या धर्माचे एक ब्रीदच आहे असे कित्येक धर्माचे उपदेशक सांगत असतात. खुद्द परमेश्वर या पृथ्वीवर राज्य करण्यास येणार असून त्याच्या अंमलांत विषमावस्था कोठे औषधासहि मिळणार नाही असें प्रतिपादन हे लोक मोठ्या जोराने करीत असतात. असे प्रतिपादन करणारे लोक हे वस्तुतः धर्मवेडे असतात. धर्मवेड्यांइतके खरे भाविक कोणी नाहीत. ग्रीक आणि रोमन रियासतींतील गुलामांस ख्रिस्ती धर्म इतका मानवला याचे कारण हेच की, या धर्माच्या उपदेशांत समतेच्या तत्वाचा प्रमुखपणे उल्लेख होत असे. त्यामुळे त्या बिचाऱ्यांची साहजिकच अशी कल्पना झाली की सर्व जग ख्रिस्ती झाले, तर त्यामुळे सर्वत्र समता उत्पन्न होऊन गुलामगिरीचे समूळ उच्चाटन होईल. आपण एकदां गुलामगिरीतून सुटलों झणजे यथेच्छ खाऊन पिऊन आनंद करूं, अशी त्या बिचाऱ्यांस आशा उत्पन्न होऊन ख्रिस्ताच्या निशाणाभोंवतीं ते जमा झाले. ज्यांनी या तत्वाचा उपदेश केला ते उपदेशक धर्मवेडे असले, तरी खरोखर फार भाविक होते. परमेश्वर या जगावर राज्य करण्यास येईल, ही कल्पना खरी मानण्याइतका भोळा आणि भाविक