पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 जगांत सुखाची वृद्धि करणे जसें अशक्य आहे, त्याचप्रमाणे त्याच्या दु:खांतहि थोडीसुद्धां भर टाकणे आपणांस अशक्य आहे. सुखदुःखाचें व्यक्त स्वरूप कोठे अधिक अथवा उणे दिसले तरी त्यामुळे ज्या शक्तीच्या योगाने या संवेदना भासतात त्या शक्तींत कांहीं अधिक उणेपणा येत नाही. सुखदुःखें इकडून तिकडे गेली अथवा तिकडून इकडे आली तरी एकंदर समवायी परिणामांत त्यामुळे वैगुण्य येत नाही. निरंतर एकरूप राहणे हा त्या शक्तीचा स्वभावच आहे. त्याचप्रमाणे जीवित आणि मरण व सुख आणि दुःख ही द्वंद्वे असणे, हा जगाचा स्वभाव आहे. या द्वंद्वावांचून जगाची उत्पत्ति आणि स्थिति शक्यच नाही. तसें नसते तर अनंतकालपर्यंत. आपण देह धारण करूं अशी इच्छा करणे वावगें झाले नसते. परंतु जीविताची कल्पना आली की तिजबरोबर मृत्यूचीहि कल्पना अवश्य येणारच. सुखाच्या कल्पनेबरोबर दुःखाच्याहि कल्पनेचा जन्म होणारच. ही द्वंद्वे आहेत ह्मणून जग आहे. ही द्वंद्वे नाहीशी झाली, तर त्याच क्षणी जगहि अदृश्य होईल. खरें चिरकाल जीवित तुह्मांस हवे असेल तर ते मिळविण्यासाठी तुह्मांस क्षणोक्षणीं मेले पाहिजे. ज्यांना आपण जीवित आणि मृत्यु या नांवांनी ओळखतो, ती तात्विकदृष्ट्या एकाच स्थितीची दोन अंगे आहेत. परंतु दृष्टिभेदामुळे त्यांची एकतानता आपल्या लक्ष्यांत येत नाही. समुद्रांत एका ठिकाणी लाट उठली म्हणजे उंचवटा झाल्यासारखा दिसतो व दुसऱ्या ठिकाणी खाडा दिसतो तरी त्यामुळे ज्याप्रमाणे त्याच्या पृष्ठभागांत वास्तविक वैगुण्य येत नाही, त्याचप्रमाणे जीवित आणि मृत्यु ही एकाच स्थितीत उत्पन्न होणाऱ्या लाटेप्रमाणे आणि खाड्याप्रमाणे आहेत; अशा रीतीने दोन अंगें मिळून एक स्थिति आहे. केवळ मृत्यूच्या ह्मणजे खाड्याच्या अंगाकडे पाहणारे ते निराशावादी बनतात व जीविताच्या ह्मणजे लाटेच्या बाजूकडे पाहणारे असतात ते आशावादी बनतात. शाळेत जाणारी मुलें पाहावी तेव्हां आनंदी दिसतात; त्यांच्या गरजा भागविण्यास त्यांचे आईबाप हजर असतात; त्यांना या जगात काही उणीव आहे, याचे भानच नसते; यामुळे नैराश्याचे प्रसंगहि त्यांस ठाऊक नसतात. तीच वृद्धाची स्थिति पहा. ती मुलाच्या स्थितीच्या अगदी उलट असते. जगांत अनेक प्रकारच्या कष्टांचा त्यास अनुभव येऊन त्याच्या वृत्ती शांत झालेल्या असतात. यामुळे कसल्याहि स्थितीनें तो हुरळून जात नाही. जी गोष्ट व्यक्तीला तीच राष्ट्रालाहि लागू आहे. तारुण्यांत नुक्तेच प्रवेश करूं लागलेले राष्ट्र आशावादी असलें-आपण ह्मणूं तें करूं अशी धमक त्यास वाटत असली तर त्यात