पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

जगाची जी स्थिति आहे तशी ती आपणांस आढळली नसती. क्षुधिताला अन्नदान करून त्याची भूक चालू वेळापुरती भागविली तरी थोड्या वेळाने ती पुनः उद्भवणारच. अशाच रीतीनें मनुष्याच्या सुखासाठी आपण केलेला प्रत्येक प्रयत्न खरोखर क्षणभंगुर आहे, असे आपल्या प्रत्ययास येते. सुखदु:खांचा जो ताप साऱ्या जगाच्या अंगांत भिनून गेला आहे, त्यावर रामबाण उपाय अजून कोणीहि योजिला नाही. चिरस्थायी सुखाचें जीवित जगास देणे शक्य तरी आहे काय ? समुद्रांत एका ठिकाणी लाट उठवावयाचा आपण उद्योग केला, तर तितक्याच प्रमाणाने दुसरीकडे खाडा पडतो. सुखसाधनांची कितीहि समृद्धि केली, तरी मनुष्यांची हांव आणि ती पुरी करण्याची साधने यांचा मेळ अनादिकालापासून आजपर्यंत पडला नाही. जी स्थिति तेव्हां होती तीच आज आहे. त्या स्थितीत वृद्धि अथवा क्षय यांपैकी काहींच झालेले नाही. जगांतील आनंद आणि दु:ख आणि उच्चनीच भाव पूर्वीप्रमाणेच आतांहि आहेत. गरीब आणि श्रीमंत, रोगी आणि निरोगी, आनंदी आणि दु:खी अशा अत्यंत विरुद्ध दशेतील लोक पूर्वीप्रमाणेच आतांहि नाहीत काय ? इजिप्शियन लोकांच्या वेळी, ग्रीक लोकांच्या अमदानींत, रोमन रियासतींत अथवा सध्याच्या अमेरिकन लोकसत्ताक अमलांत लोकस्थितीत यत्किचितहि फरक नाही. इतिहासकालापासून चालू क्षणापर्यंत जगाची स्थिति अगदी एकसारखी आहे. असे असले तरी मानवी दुःख हलके करण्याचे प्रयत्नहि इतिहासकालापासून चालू आहेतच. इतिहासकालापासून प्रत्येक शतकांत इतरांच्या बऱ्याकरितां झटणारी हजारों स्त्रीपुरुष जन्मास आली, आणि त्यांच्या प्रयत्नांस कितपत यश आले याचा आढावा काढला तर ? पण या प्रश्नाचे उत्तर देण्याची जरूरच नाही. फूटबॉलच्या खेळांत ज्याप्रमाणे चेंडू इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जातो, त्याचप्रमाणे जगांतील सुखदुःखांची गति आहे असे आपणांस आढळून येते. शारीरिक यातना हलक्या करण्यासाठी यत्न करावे तो त्या यत्नांनींच मानसिक यातनांची वृद्धि होते, असा अनुभव येतो. सर्व जग सुखमय करून सोडावयाचे ही आपली कल्पना आरबी भाषेतील गोष्टींत शोभण्यासारखी आहे आणि तिची वास्तविक योग्यताहि तितकीच आहे. सर्व जग सुखी करण्यासाठी ह्मणून जें जें राष्ट्र पुढे सरतें, त्याची इच्छा पाहिली तर हीच की त्यांतल्या त्यांत त्या सुखांत स्वतःला मोठा वाटा मिळावा. अहाहा! यापेक्षा अधिक निःस्वार्थी उद्योग कोणता आहे बरें ? आणि असल्या निःस्वार्थी उद्योगाने जगाचें कोटकल्याण होणार!