पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

हरवलेले 'मी' आणि 'माझें' पुन्हां परत मिळण्याची आशा आहे काय ? त्याने उत्तर दिलेच तर 'मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहं । न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे।' अशाच प्रकारचे काही उत्तर तो देईल. 'मी' आणि 'माझें' हे एकवार अनंतत्वांत हरवलें ह्मणजे तें कायमचेच हरवले.

 अशा रीतीने नीतितत्वे आणि धर्मतत्वे यांचा सुखकर मिलाफ कर्मयोगांत झाला असून 'निःस्वार्थी होऊन आणि युक्तकमे करून मुक्त हो,' असा त्याचा उपदेश आहे. अमुक एका मतावर विश्वास ठेवला पाहिजे अथवा अमुक एक धर्म खरा मानिला पाहिजे असें बंधन कर्मयोग्यास नाही. फार काय, पण परमेश्वराचे अस्तित्वहि त्यास मान्य नसले तरी चालेल. आत्मा काय आहे आणि परमात्मा कोण इत्यादि प्रमेयांचे उद्घाटन करीत बसण्याचेंहि त्यास प्रयोजन नाही. या देहांत प्रत्ययास येणारा इतकाच 'मी' नसून त्याचे खरे स्वरूप जाणण्याचा कर्मयोग्याचा मार्गच निराळा आहे. हा मार्ग कर्मयोग्याने स्वतःच आक्रमिला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्याने स्वार्थ विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी प्रमेये बुद्धीला आटोकाट ताण देऊन समजावयाची तींच प्रमेयें कर्मयोग्याला कर्मे करून प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभवावयाची असतात. त्याला कोणत्याहि मताची अथवा कोणत्याहि उपपत्तीची मदत होण्याचा संभव नसतो. अव्यभिचारी भक्तीनें भक्ताला अथवा अत्युच्च ज्ञानाने ज्ञात्याला जो अनुभव होतो, तोच कर्मयोग्याला कर्मांनी मिळवावयाचा असतो. निःस्वार्थी कर्म हाच कर्मयोगांतील पहिला धडा आहे.

 आतां यापुढे आणखी एका प्रश्नाचा विचार कर्तव्य आहे. 'कर्म ह्मणजे काय ? नि:स्वार्थी कर्म करा, जगाच्या बऱ्यासाठी कर्म करा, असें तुह्मीं ह्मणतां; पण आमच्या हातून जगाचें बरें काय होणार?' अशा प्रकारच्या प्रश्नपरंपरेस काय उत्तर देतां येईल याचा आतां विचार करूं. आपणास जगाचे बरे करता येईल की नाही, या प्रश्नास केवळ निरपेक्षदृष्टीनें-केवळ परमार्थदृष्टया-उत्तर द्यावयाचे म्हटले तर तें नकारार्थीच दिले पाहिजे. केवळ तात्विकदृष्टया बोलावयाचें म्हटले तर जगाचेंच काय पण एखाद्या अत्यंत क्षुद्र व्यक्तीचेहि आपण बर करूं शकत नाही. पण या विचारांत दुसरीहि एक दृष्टि आहे, ही गोष्ट विसरून चालावयाचें नाही. सापेक्षदृष्टीने पाहतां आपणांस बऱ्याच गोष्टी जगाच्या बऱ्याकरितां करता येणे शक्य आहे. जगाचे चिरकालिक कल्याण होईल अशी एकहि गोष्ट आपणांस करता येणे शक्य नाही. कारण तसें असतें तर आजला