पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

( देहधारी) अशा स्वरूपाचा राहिला नसून तो विश्वव्यापी झाला, असे समजावें. विश्वांत जे जे ह्मणून दृश्यास आलेले आहे, तें तें सर्व तोच, इतका त्याचा मोठा विस्तार होतो. 'हे विश्वचि माझें घर। ऐसी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण झाला ॥' हेच त्याच्या स्थितीचे योग्य वर्णन होय. 'मी' आणि 'माझें' ह्मणणारी त्याची क्षुद्रवृत्ति अनंतत्वांत एकवार हरवली ह्मणजे तिचा पुनः पत्ता लागत नाही. सर्व धर्म, सर्व नीतिशास्त्रे आणि सर्व तत्वज्ञान हेच साध्य साधा, म्हणून उपदेश करीत आहेत. हे स्थितिवर्णन ऐकून देहाध्यासपिशाचाने पूर्ण पछाडलेल्या मनुष्याची भीतीने गाळण उडते. परंतु अशी मनुष्येहि नीतितत्वांचा उपदेश करीत असतात, असें पुष्कळ वेळां आढळून येते. अशावेळी स्वतःस न समजतां ती त्याच साध्याचा उपदेश करीत असतात. मनुष्य कितीहि देहाध्यासी असला तरी अमुक एक प्रतीचा स्वार्थत्याग केला ह्मणजे नीतीची परम सीमा झाली, असें ह्मणत नाही. किंबहुना अशा प्रकारची परम सीमा निश्चित करता येणेच त्यास शक्य नाही. अशा रीतीने केवळ नीतिशास्त्राचा पूर्ण अवलंब करावयाचा म्हटले तरी विश्वरूप होईपर्यंत मध्ये कोठे थांबतां येणेच शक्य नाही. आमचें तरी ह्मणणे हेच आहे की विश्वरूप होणे हीच शेवटची पायरी आहे. मग ती तुह्मीं कोणत्या मार्गाने सिद्ध केली हा प्रश्न यत्किंचिहि महत्वाचा नाही. आमच्या विचारांत व देहाध्यासी मनुष्याच्या नीतिमार्गात फरक इतकाच की त्याला स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीस शेवटपर्यंत चिकटून राहण्याची छाती होत नाही. त्याच्याच बुद्धीने दाखविलेले अंतिम साध्य पाहून त्याला भीति वाटते. जिच्यासाठी सर्व सृष्टि धडपड करीत आहे त्या मुक्तीचा मार्ग दाखविणे हेच कर्मयोगाचेंहि साध्य आहे. स्वार्थ विसरून अनासक्त विचाराने कर्म केलें ह्मणजे मुक्ति मिळते, असें कर्मयोगाचे सांगणे आहे. या एकंदर विवेचनाचा मथितार्थ हा आहे की, स्वार्थप्रेरित प्रत्येक कर्म आपणांस आपल्या साध्यापासून दूर नेते, आणि अनासक्त चित्ताने केलेले प्रत्येक कर्म आपणांस आपल्या साध्याच्या जवळ नेतें. यावरून नीति आणि अनीति यांची व्याख्या अशी आहे की प्रत्येक स्वार्थप्रेरित कर्म अनीतिवर्धक, आणि निःस्वार्थी असे प्रत्येक कर्म नीतिवर्धक.

 अनीतिवर्धक कर्मे आणि नीतिवर्धक कमें यांची व्याख्या परमार्थतः इतकी सोपी असली तरी त्या कर्माचे प्रत्यक्ष-व्यवहार्य-स्वरूप ठरविणे सोपे नाही. परिस्थिति बदलली ह्मणजे पूर्वीची विहित कमें अविहित कशी होतात व पूर्वी अविहित ह्मणून समजलेली कर्मे विहित होण्याचा संभव कसा उत्पन्न होतो, याचे