पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

पुरुष परमेश्वराची प्रार्थना करतो, आणि आपणापाशी अमुक वस्तु नाही या विचाराने श्रमी झालेला पुरुष ती वस्तु मिळविण्याकरितां चोरी करतो. 'माझ्याजवळ अमुक वस्तु नाही,' हा विचारच येथें पाशरूप झालेला असतो. ती वस्तु मिळाली म्हणजे या पाशाचे अस्तित्व नाहीसे होईल, या भावनेनें चोर चोरी करितो. विश्वांतील यच्चयावत् पदार्थ-जड अथवा सचेतन-मुक्तीसाठींच धडपडत आहेत. आपण मुक्तीसाठी धडपडत आहों याचे ज्ञान कित्येकांस असते आणि कित्येकांस नसते. पण एवढ्या फरकामुळे मार्ग भिन्न होऊन अंतिम परिणामहि विपरीत होतात. आपली गरज काय आहे व ती पुरविण्याचा मार्ग कोणता याचे ज्ञान ज्यास बरोबर झाले आहे, असा मनुष्य योग्य मार्गावर आरूढ होऊन शेवटीं अनिर्वाच्य सुखाच्या स्थितीस पोहोचतो. परंतु आपली वास्तविक गरज काय आहे याचेच ज्ञान चोरास नसते; यामुळे विपरीत मार्गाने जाऊन शेवटी त्याची फसगत होते. जीवात्मा मोकळा व्हावयाचा तें बाजूस राहून उलट आणखी नवे पाश त्याच्या गळ्यांत पडतात. याकरितां आपणास पाहिजे काय व तें मिळविण्याचा मार्ग कोणता याचे बरोबर ज्ञान असणे प्रत्येकास आवश्यक आहे.

 जगांतील सर्व धडपड मुक्तीकरतां सुरू आहे, ही गोष्ट सर्व धर्मानी सूचित केली आहे. सर्व धर्मानी प्रतिपादिलेली नीतितत्वें व सांगितलेला स्वार्थत्याग यांच्या मुळाशी हेच तत्व आहे. मी ह्मणजे देह हा जो जन्मापासून लागलेला अध्यास तो सुटून जीवात्मा मुक्त व्हावा याच करितां सर्व धर्माचा अवतार आहे. ज्यावेळी एखादा मनुष्य परोपकारासाठी झटतो असे आपण पाहतों त्यावेळी त्याची बुद्धि केवळ 'मी' आणि 'माझें' एवढ्यांतच गुंतली नसून ही हद्द त्याने ओलांडिली आहे असे सहज आपल्या लक्ष्यांत येते; तथापि परोपकार करीत असतां दिसून येणारा स्वार्थत्याग कितीहि मोठा असला तरी ती शेवटची पायरी नव्हे, हे आपण लक्ष्यात ठेवले पाहिजे. परोपकाराकरितां जीव दान दिला तरी त्याच्या मुळाशी कीर्तिसंपादनाचा स्वार्थ असण्याचा संभव आहे. यासाठी 'मी' आणि 'माझें' यांची पूर्ण विस्मृति होणे हेच साध्य आहे असे सांगण्याचा सर्व धर्माचा, पंथांचा, अथवा नीतिशास्त्रांचा रोंख आहे. मनुष्याला अशा प्रकारचा पूर्ण त्याग करितां आला, तर त्याची स्थिति तरी कोणत्या प्रकारची होईल अशा प्रकारचा प्रश्न उद्भवेल. त्यावर उत्तर असे की, अशी स्थिति प्राप्त झाल्यानंतर असा मनुष्य अमुक एक गोमाजी