पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे. बाह्यतः जरी ते माग वेगळे दिसले तरी तत्वतः त्यांचा एकमेकांशी अत्यंत निकट संबंध आहे. त्यांच्यापैकी व्यवहारांत ज्याचें स्वरूप अधिक उघड दिसतें त्यावरून एखादें विशिष्ट नांव त्या मार्गास आपण देतो; पण त्यामुळे इतर मार्गातले कोणतेंहि तत्व त्यांत अंतर्भूत होणार नाहीं असें नाही. एखादा मनुष्य कर्मयोगी असला तरी तो ज्ञानी असणार नाही असें नाही. एखादा भक्त असूनहि राजयोगी असू शकेल. अथवा तिसरा एखादा ज्ञानी असून भक्तहि असेल. एखाद्या मनुष्यांत एखाद्या मार्गाचे स्वरूप उघड दिसते व त्यावरून तो अमुक मार्गाचा असे आपण ह्मणतों इतकेंच. हे चार मार्ग आरंभी भिन्न दिसले तरी त्यांचं लक्ष्य एकच असल्यामुळे पुढे पुढे ते ऐकमेकांजवळ येतात, व शेवटी त्या लक्ष्यांत एकरूप व एकजीव होतात. त्याचप्रमाणे जगांतील सर्व धर्म आणि पंथ यांचे पर्यवसानहि शेवटी त्याच लक्ष्यांत होते.

 हे लक्ष्य-साध्य-कोणते याचा उलगडा मी पूर्वी केलाच आहे. मुक्ति मिळविणे हेच सर्वांचें साध्य आहे. आपणाभोंवती दिसणारा प्रत्येक अणुरेणु मुक्तीसाठीच धडपड करीत आहे. नुसत्या डोळ्यांनी न दिसण्याइतक्या सूक्ष्म पदार्थापासून तो मनुष्यापर्यंत आणि अगदी निर्जीव जड पदार्थापासून तो जगांतील अत्युच्च दर्जाच्या जीवात्म्यापर्यंत सर्वांची धडपड केवळ मुक्तीकरतां आहे. किंबहुना ही धडपड आहे ह्मणूनच हें विश्व आकाराला आले आहे. प्रत्येक अणूच्या गतीचे सूक्ष्म अवलोकन केले, तर तो इतरांपासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करीत असून, इतर अणू त्याला आपल्याजवळ ओढीत असतात असे आढळून येईल. आपली ही पृथ्वि सूर्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी करीत आहे; तसेंच चंद्रहि पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी प्रत्येक क्षणी धडपड करीत आहे. भोवतालची बंधनें तोडून अनंतांत जाऊन मिळावें हाच हेतु या साऱ्या धडपडीच्या मुळाशी आहे. केवळ याच हेतूने प्रेरित होऊन सत्पुरुष परमेश्वराची भक्ति करतात आणि याच हेतूने चोरहि चोऱ्या करतात. सर्व कमोंच्या मुळाशी हेतु एकच आहे. हा हेतु सिद्ध करण्याचा मार्ग अयोग्य असला ह्मणजे त्याला आपण पातक असें नांव देतों व योग्य मागाने हेतु सिद्ध करूं पाहणारास आपण सज्जन ह्मणतों. मार्गाच्या इष्टानिष्टतेप्रमाणे नांवें भिन्न झाली तरी मुळांत हेतु तोच आहे. मुक्ति मिळवून अनंताशी एकरूप-एकजीवहोणे हाच हेतु सर्व विश्वांतील पदार्थाचा आहे. आपणाभोवती असणारे पाश कोणत्या प्रकारचे आहेत याचे ज्ञान होऊन त्यांच्या जाचामुळे श्रमी झालेला