पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठिकाणी अत्यंत लीन झाल्या आहेत, ज्यांच्या सर्व वासना ब्रह्मरूप पावल्या आहेत, सदैव ब्रह्मचिंतन करणे हाच ज्यांचा उद्योग,. त्यांस करावयाचे असें कांहींच उरलेले नसते. ही अगदी शेवटची पायरी झाली. पण त्यांशिवाय बाकीच्या सर्वांस कर्म करणे भागच आहे. परंतु कर्म करीत असतां त्यामुळे विश्वांतील एखाद्या अणूसहि आपल्याकडून मदत होत आहे, असा विचार आपल्या चित्तास शिवू नये. कारण त्यास स्वतंत्रपणे मदत करणे हे आपणांस शक्यच नाही. या जगद्रूपी तालमीत आपण आपलेच शरीर कमावीत असतो. कर्म करीत असतां सदैव ध्यानांत बाळगावयाचें तें हेंच. आपण या गोष्टीचा केव्हांहि विसर पडू दिला नाही व कर्म करणे हा एक विशिष्ट हक्कच परमेशाच्या कृपेने आपणांस प्राप्त झाला आहे, अशी भावना बाळगली ह्मणजे आसक्ति आपल्या चित्तांत बिऱ्हाड करणार नाही. तुमच्या आमच्यासारखे लक्षावधि लोक स्वतःस मोठे समजून त्यांत गर्क असतात; पण तुह्मी आम्ही मरण पावलों तर पांच मिनिटांच्या आंतच तुमचे आमचे विस्मरण जगास होईल. परमेश्वराची मर्जी नसेल तर एक क्षण तरी जीवंत राहणे तुह्मां आम्हांस शक्य आहे काय ? सर्व कर्ता करविता तोच आहे. सर्व सामर्थ्य त्याचेंच. विश्वांतील यच्चयावत् वस्तूंत आढळणारे सामर्थ्य त्याच्या इच्छेवरच अवलंबून आहे. त्याच्याच आशेनें वारा वाहतो, सूर्य प्रकाशतो, माणसें जगतात आणि मृत्यु हरण करतो. सर्व तोच आणि सर्वांतर्यामी तोच. त्याची पूजा करावी इतकीच आपली योग्यता. सर्व कर्माचे फल त्यास अर्पण करा. चांगले हि केवळ त्याच्याचसाठी त्याच्याच हुकमाने करावयाचे अशी दृढ भावना धरा; ह्मणजे अनासक्ति तुमच्या ठिकाणी उत्पन्न होईल. आपणांस जखडणारे पाश खटाखट तुटून आपण मुक्त होऊं. मुक्ति मिळविणे हेच कर्मयोगाचें साध्य आहे.

प्रकरण ८ वें.
कर्मयोगाचा आदर्श.

 अनेक प्रकारच्या निरनिराळ्या मार्गानी गेले तरी सर्वांचे पोहोचण्याचे ठिकाण एकच आहे. ही वेदांताची कल्पना अत्युच्च दर्जाची आहे. हे मार्ग सामान्यतः चार प्रकारचे आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. हे चार मार्ग भिन्न असले तरी त्यांचा परस्परांशी काहीच संबंध नाहीं असें मात्र नव्हे. केवळ नांवांवरून भिन्नता दिसते तितकी ती प्रत्यक्ष आचारांत नसते, ही गोष्टस्वा. वि. १०