पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

इमारतीचा पाया रचला, तो पंचविसावा बुद्ध मात्र आपणांस माहित आहे. केवळ विचारांत केवढें सामर्थ्य वास करीत असते, याची जाणीव त्या पूर्वीच्या बुद्धांस पूर्णपणे होती. मनुष्यजातीस अज्ञात अशा एखाद्या गुहेत आपण जाऊन राहिलों व केवळ पांचच विचारतरंग आपल्या चित्तांत उद्भवले तरी ते अनंतकाल जगांत राहतील अशी त्यांची पक्की खात्री होती. असे पांच विचारतरंग पर्वतांच्या कित्येक गुहा फोडून व अनेक समुद्र ओलांडून सर्व जगभर प्रवास करून त्यांत भरून राहतील असें सामर्थ्य त्यांत असते. त्यांचे ग्रहण करण्यास योग्य अशी मानवी अंत:करणें सांपडतांच ते त्यांत शिरून त्यांस जागे करितात. ज्यांना या विचारांनी जागृति आली आहे, अशी स्त्रीपुरुषे त्या विचारांचे व्यवहार्यरूप आचरणांत व्यक्त करितात. जगाच्या कल्याणाकरितां झाले तरी त्यांत फिरून ज्ञान सांगावयाचे म्हणजे वादविवाद होणार, आणि अनेक प्रकारच्या अडचणींशी तोंड देण्याचे नित्य प्रसंग येणार हे उघड आहे. हे करावयास बऱ्याच रजोगुणाची अपेक्षा असते. यामुळे सत्वगुणैकमूर्ति महात्मे जगांत येऊन आपले ज्ञान व्यक्त करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. केवळ ब्रह्मरूप होऊन बसल्यानंतर जगाच्या अस्तित्वाची जाणीव उत्पन्न होण्याइतकाहि रजोगुण त्यांच्या ठिकाणी नसतो. प्रत्यक्ष कार्यकारी जे बुद्ध आणि ख्रिस्त हे कितीहि उत्तम पुरुष असले तरी अज्ञानाची शेवटची छटा त्यांच्या ठिकाणी राहिलेली असते. आपल्या हृदयांत अशुद्धत्व थोडे तरी शिल्लक असल्याशिवाय जगांत येऊन काम करणे आपणांस शक्य नाही. कोणतेंहि कर्म झालें. तरी कर्म म्हटले की त्यांत हेतु आणि आसक्ति यांची अगदी थोड्या अंशाने तरी उत्पत्ति असावयाचीच. कर्माचा हा स्वभावच आहे. परंतु एखादें क्षुद्र कार्य करून त्याबद्दल महत्कीर्तीची अपेक्षा करणे हे मूर्खपणाचे आहे. ज्याच्या इच्छेवांचून गवताची एक काडीहि इकडची तिकडे होऊ शकत नाही व जो अगदी अणुवत् कीटकाचीहि पूर्ण काळजी वाहतो त्या परमात्म्यासमोर उभे राहून आपण आपल्या क्षुद्र कृत्यांचा डांगोरा पिटावा हे आपणास शोभते काय ? वास्तविक विचार केला तर असें करणें हैं, परमेश्वराचा अत्यंत उपमर्द करण्यासारखें आहे. त्याच्या समोर उभे राहून 'परमेश्वरा तुझी मर्जी' इतकेच ह्मणण्याची आपली योग्यता आहे.

 सत्वगुणैकमुर्ति पुरुष प्रत्यक्ष जगांत कांहींच कार्य करीत नाहीत; कारण त्यांच्या ठिकाणी आसक्तीचा यत्किंचित् अंशहि उरलेला नसतो. ज्यांच्या वृत्ति ब्रह्माच्या