पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१४१

 कर्तव्य या शब्दाचा खरा अर्थच आपणांस समजत नाही. अमुक कर्म करावें. असे आपल्या मनांत येते त्यावेळी काही तरी शारीरिक सुखाच्या कल्पनेने हा विचार आपल्या चित्तांत उद्भवलेला असतो. हा विचार बहुधा नेहमी तृष्णाजन्य असतो. अनंत कालाच्या संवयीने इंद्रियजन्य सुख हेच आपले सर्वस्व होऊन बसते आणि त्याच्या प्राप्त्यर्थ करावी लागणारी कमें ही सर्व कर्तव्येच आहेत, असे आपणांस वाटू लागते. उदाहरणार्थ, आपण काही सांसारिक कर्मास पतिपत्नीमधील कर्तव्ये असें ह्मणतो. पण ज्या देशांत लग्नविधीच नाही, तेथें पति आणि पत्नी हे नातेंच नाही. त्यामुळे तेथें पतिपत्नीची कर्तव्ये हा शब्दहि ठाऊक. नाही. स्त्रीपुरुष लग्न करितात ती एकमेकांच्या सुखाकरितां करितात. अशी चाल बरीच काल चालू राहिली ह्मणजे त्याच चालीने कर्तव्ये निर्माण होऊ लागतात. एखादा मंदरोग जडला ह्मणजे फारसा त्रास न देतां तो मनुष्याचे शरीर हळुहळु भक्षण करतो! मनुष्याच्या शरीरावर एखाद्या विकाराचा जाज्वल्य परिणाम झाला तर त्याला आपण रोग असें नांव देतो; पण तोच परिणाम अत्यंत मंद-दृष्टोत्पत्तीस न येण्या इतका मंद-असला ह्मणजे प्रकृतीच तशी असें वाढू लागते. मंदगतीमुळे त्याचे रोग हे वाईट स्वरूप आपल्या नजरेस येईनासें होतें: तथापि सशास्त्र दृष्टीने तो रोगच. तसेंच पत्नीबद्दल फाजील आसक्ति असणे हाहि वास्तविक रोगच आहे; पण त्याचे सान्निध्य कित्येक शतकें-सहस्रकें-असल्यामुळे आपण त्याला कर्तव्य हे गोंडस आणि भपकेबाज नांव दिले आहे. लग्न झालें ह्मणजे तासेमर्फे वाजवावे, ब्राह्मणांनी मंत्र ह्मणावे, देव आणि अग्नि साक्षीस आणावे, आणि लोकांनी फुलें अक्षता उधळाव्या; आणि लग्न झाल्यावर त्याच बायकोच्या नादी लागून नवऱ्याने वाटतील ती अमानुष कृत्ये करावी आणि त्याला कुटुंबाचे कर्तव्य असें नांव द्यावें, हा प्रकार जगांत जिकडे तिकडे चालू आहे. सामान्य व्यवहारांत ज्याला आपण कर्तव्य असें ह्मणतो, त्याचा थोडासा उपयोग इतकाच आहे की तेवढी तरी जाणीव असल्याने मनुष्य अगदीच पशूच्या कोटीस न जातां थोडा तरी शुद्धीवर असतो. ज्या पामरांना याहून उच्च दर्जाचा विचारच मनांत येणे शक्य नाही, त्यांस अधिक खाली जाऊ न देण्याकरितां या बागुलबोवाचा उपयोग होतो. पण ज्यांना कर्मयोगी व्हावयाचें असेल त्यांनी कर्तव्याच्या या सामान्य कल्पनेस आपल्या डोक्यांतून प्रथम, हद्दपार केले पाहिजे. असले कर्तव्य तुमच्या आमच्यासारख्यांच्या उपयोगी नाही. जगाकरितां कांहीं करावयाचे आमच्या मनांत असेल तर ते आम्ही खास