पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

करूं; पण कर्तव्याच्या या बागुलवोवास भिऊन मात्र नाही. कर्तव्याचे भूत आमच्या पुढे उभे करून आम्हांस कोणी काही करावयास भाग पाडील ही गोष्ट कोणी स्वप्नांतहि आणूं नये. आम्हांस कोणतेंहि कर्म करावयास भाग पाडणारा कोणी -मायेचा पूत जन्मास आला आहे काय? नाहीं, खास नाही. आपण नित्य लक्ष्यांत बाळगिले पाहिजे ते हे की, कोणासहि भिऊन अथवा कोणी भाग पाडले ह्मणून आपण कांहीं कर्म केले तर त्याचे पर्यवसान शेवटी आसक्तींत व्हावयाचेंच. अमक्यासाठी कर्तव्य आणि तमक्यासाठी कर्तव्य असला नेभळटपणाचा विचारच मनांत आणू नका. आपला देह, आपलें मन आणि आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. धडाडून पेटलेला हा संसाराग्नि आपणा सर्वांची पूर्णाहुती घेण्याची इच्छा करीत आहे. त्याच्या ज्वाळा प्रत्येक क्षणी जवळ जवळ येत आहेत. त्यांचा दुःसह ताप आपणांस भाजून काढीत आहे. मित्रांनो, हा अमृताचा पेला घ्या ह्मणजे हाच अग्नि चंद्रासारखा शीतळ होईल, आणि तुह्मांस अनुपमेय सुखाची प्राप्ति होईल. वास्तविक कर्ता करविता निराळा असून आपण सर्व त्याचे नुसते हस्तक आहों. असे असतां तुह्मांला एखाद्या कर्माबद्दल बक्षिस हवेसे वाटले तर दुसऱ्या एखाद्या कर्माबद्दल चाबूक खाण्याचीहि तुमची तयारी असली पाहिजे. चाबूक नको असे वाटत असेल तर बक्षिसाची आशा सोडली पाहिजे. चाबूक आणि बक्षिस हे सहोदर आणि संलग्न असल्यामुळे जेथें एक जातो तेथे दुसरा येणारच. त्यांची जोडी फुटणे नाही. तुमच्या एका बाजूस सुख आणि दुसऱ्या बाजूला दुःख अशी जोडीने चालली आहेत. एका बाजूला जीवित आहे तर दुसऱ्या बाजूस मृत्यु आहे. जर तुम्हांस मृत्यूच्या पलीकडे जावयाचे असेल तर जीविताची आशा सोडली पाहिजे. तशा स्थितीत तुम्ही प्रवेश केला तर चालू जीवित आणि मृत्यु यांची किंमत तुम्हांस सारखीच वाढू लागेल. असो. यावरून दुःखावांचून निर्भेळ सुखाचें जीवित आणि मृत्युवांचून जीवित ह्या कल्पना शाळेत जाणाऱ्या पोरांसच शोभणाऱ्या आहेत, अशी तुमची खात्री होईल. ज्याची दृष्टि ज्ञानमय झाली आहे, त्याला या स्थितीची अशक्यता तेव्हांच पटते आणि तो या कल्पनेचा तत्क्षणीच त्याग करून सुखी होतो. जें काही तुम्ही करीत असाल त्यापासून स्तुतीचा एखादा शब्द अथवा कांहीं बक्षिस मिळण्याची आशा करूं नका. आपण एखादे चांगले कृत्य करण्याचीच खोटी, की त्याजबद्दल आपला गौरव व्हावा असे आपणांस वाढू लागते. एखाद्या निराश्रितांच्या फंडाला थोडेसे पैसे दिले की आपलें नांव कोणकोणत्या पत्रात आले आहे