पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

पाठीस लागतात. त्यांना स्नान करावयास अथवा परमेश्वराचे नांव घ्यावयासहि वेळ मिळत नाही. सारी 'कर्तव्ये करून मट्ट्यास आलेलें शरीर जमिनीवर आडवें होईपर्यंत एकसारखें 'कर्तव्यास' जुंपलेले असावयाचें. कामावरून हे लोक घरी आले तरी कामाचे विचारच त्यांच्या डोक्यांत घोळावयाचे. स्वप्नांतहि त्यांस तें पिशाचरूपी 'कर्तव्य' सोडीत नाही. त्या बिचाऱ्यांस झोपहि चांगलीशी लागत नाही. अरेरे, 'कर्तव्य' 'कर्तव्य' ह्मणून भ्रमात पडलेला हा प्राणी याच भ्रमांत एखादे दिवशी मरण पावतो. सामान्यव्यवहारांत ज्याला कर्तव्य असे आपण समजत असतो, त्याचा हाच प्रकार चोहोकडे आपणांस आढळून येतो. परंतु हे आपले कर्तव्य नव्हे. बायकापोरांच्या, आप्तेष्टांच्या अथवा स्वतःच्या सुखकल्पनांस बळी पडून कर्मे करणे, हे कर्तव्य नव्हे. आनासक्त चित्ताने आणि स्वतःच्या सुखकल्पनांस बळी न पडतां प्राप्त झालेली कामें केवळ ईश्वराची आज्ञा ह्मणून पार पाडून फल त्यास अर्पण करावयाचे हे आपलें खरें कर्तव्य आहे. सर्व कर्मे ही त्याचीच आज्ञा ह्मणून करावयाची. आपणांस त्याच्या हुकमानें या जगांत मनुष्यदेह मिळाला हा त्याचा उपकार. त्याच्या हुकमानें प्राप्त झालेली कर्तव्ये सुचतील तशी करावयाची. ती बरी अगर वाईट झाली तर त्याचा तो पाहून घेईल. त्याचा विचारच आह्मांस नको. ती चांगली झाली तर त्यांची चांगली फळे आह्मांस नकोत, तसेंच ती वाईट झाली तर त्यांची वाईट फळेहि ज्याची तोच घेणार. चित्त सदोदित शांत ठेवा; सुखकल्पनांचे बंदे गुलाम होऊन दिवसभर राबू नका; आणि मग प्राप्तकर्तव्य खुशाल करा. हा धनीपणा-हें स्वातंत्र्य मिळविणे फार कठीण काम आहे. भिकारदेहाच्या तुच्छ वासना तृप्त करण्याकरितां नीच कमें करून त्यांस 'कर्तव्ये' असें सोज्वल नांव द्यावयाचे हे मात्र सध्या फार सोपे झाले आहे. वाटेल त्याच्या माना कापाव्या, वाटेल तसे घातपात करावे आणि वाटतील ती कर्म करावी. 'अमुक असें तूं कां केलेंस' ह्मणून विचारणारा कोणी भेटलाच तर 'काय करावे, हे माझें कर्तव्य ह्मणून मी केले,' असा जबाब द्यावा. याहूनहि अधिक मखलाशी करावयाची असली तर आपल्या या धनतृष्णाकूपावर आणखी काही फुलें पसरावी हाणजे झाले. आपल्या कृतीला काही देशाहिताचें, मित्रहिताचे अथवा कुटुंबहिताचे रूप द्यावें, ह्मणजे त्याखाली हवी ती कृष्णकृत्ये लपली जातात. कर्तव्य या शब्दाचा हाच अर्थ सध्या पुष्कळांस पटल्या सारखे दिसतें!