पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३९

आपल्याकडून स्वतःची कमें करवितो आणि अमुक करावे असे आपल्या मनांत येतें, तो त्याचाच हुकूम अशी दृढभावना त्यांनी धरिली पाहिजे. 'यत्करोषि यदनासि यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणं ॥' असा हा कर्म योगाचा दुसरा मार्ग भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितला आहे. कर्ता करविता सर्व परमेश्वर आहे, मग आपण सुखदुःखांनी स्वतःस व्यर्थ शीण कां करून घ्यावा? अशा विचाराने भक्तांनी सदोदित संतुष्टवृत्तीने राहिले पाहिजे. त्यांनी आपले शरीर आणि आपले मन भगवंतास अर्पण केले पाहिजे. मोठमोठे अग्नि प्रदीप्त करून त्यांत आहुती देण्यापेक्षा हा महायज्ञ करा. हा शेवटास गेला की, ज्ञानजलाच्या अवभृथस्नानाने तुह्मी मुक्त व्हाल. 'या जगांत आढळणाऱ्या वस्तु, बऱ्या, वाईट अगर उपेक्ष्य असोत, त्या सर्व त्याच्या आहेत. मला त्यांपैकी कांहींच नको' असे आपण सदोदित आपल्या चित्तांत वागवू या. ही संवय सदोदित राहिली ह्मणजे ती हळु हळु स्वभावरूप होऊन तिचा प्रवेश आनखशिखाग्र आपल्या देहांत होईल; आपल्या रोमरोमांत ती पक्की भिनून जाईल. इतकी स्थिति झाल्यावर मग हातघाईच्या लढाईत प्रवेश करून, आपल्या प्रचंड कडकडाटाने मेघराजाला लाजवू पाहणाऱ्या तोफांच्या तोंडावर आपण चाल करून गेलों, तरीहि आपली मनःशांति आपणांस सोडून जाणार नाही.

 सामान्य व्यवहारांत ज्याला आपण कर्तव्यकर्म असें म्हणतो ती कर्मयोगाच्या दृष्टीने अगदी खालची पायरी आहे. अशी कर्तव्ये आपणा सर्वांच्या मागें रोजची लागलेली आहेत. कर्तव्य कर्तव्य म्हणून रोजची कामें करीत असतां, त्यांतच दुःखाची उत्पत्ति होते, असा आपणांस नेहमीं अनुभव येतो. अशावेळी त्या कर्माचे कर्तव्य हे रूप जाऊन तो एक रोगच आपणांस जडल्यासारखा होतो. आणि मग या कर्तव्यरोगाचे पाऊल एकसारखें पुढे पुढेच पडत जाते. जें जें कांहीं करावेंसें चित्तांत येतें तें तें सारें कर्तव्यच वाढू लागते. आणि या कर्तव्यभ्रमाच्या चरकांत आपण एकदां सांपडलों म्हणजे सर्व आयुष्य संपेपर्यंत त्यांतून सुटका होत नाही. कर्तव्यभ्रम हा आपल्या साऱ्या आयुष्याचे मातेरें करितो. भर उन्हाळ्यांतला माध्यान्हींचा सूर्य जसा वस्तु करपवून टाकतो तसा हा कर्तव्यभ्रम आपल्या सााऱ्या आयुष्याची होळी करतो. संसारचक्रांत पूर्ण सांपडलेल्या आणि कर्तव्यभ्रमानें गुलामाच्या स्थितीस पोहोंचलेल्या या पामरांकडे पहा! सकाळी उठल्यापासून त्यांची 'कर्तव्ये त्यांच्या