पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

नाचा वास बाह्य देहावर नसून त्याच्या आंत आहे. बाह्य वस्तु आपल्या मनाशी जोडून देण्याचे काम इंद्रियद्वारा देह करितो इतकेंच. पण त्यापासून जें बंधन प्राप्त होते ती सांखळी आंतच तयार होते. यासाठी 'मी' आणि 'माझें ही भावना जाऊन बाह्य पदार्थाचा व आपला संबंध तुटला, तर आपण उदासीन होऊ. एखादा मनुष्य राजा असून आणि सर्व भोग भोगूनहि उदासीन असू शकेल; आणि दुसरा एखादा लंगोटी लावूनहि अत्यंत आसक्त असू शकेल. यासाठी. प्रथम उदासवृत्ति बाणली पाहिजे; आणि नंतर सदैव कार्यरत असले पाहिजे. ही उदासीनवृत्ति आपल्या अंगी कशी आणावी याचा कर्मयोगानें बराच खुलासा होतो; तथापि ही स्थिति साध्य करणे मोठे बिकट काम आहे.

 कर्मयोगाने मुख्यतः दोन मार्ग सांगितले आहेत. एक मार्ग निरीश्वरवादी लोकांकरितां आहे. ज्यांना परमेश्वराचे अस्तित्व मान्य नाही अथवा त्याबद्दल ज्यांच्या वृत्ती साशंक आहेत आणि परमेश्वराचे आपल्या कार्यात आपणांस साहाय्य मिळते अशी भावना ज्यांच्या चित्तांत उत्पन्न होत नाही, अशा लोकांकरितां एक मार्ग कर्मयोगाने आंखून दिला आहे. त्यांनी स्वबुद्धीनेच सदैव कार्यमग्न असावें. स्वतःस सुचेल अथवा बरा वाटेल असा मार्ग त्यांनी स्वीकारून कार्यरत रहावें. त्यांची स्वतःची सदसद्विवेकबुद्धि हाच त्यांचा मोठा आधार. अशा रीतीने कार्यमग्न असतां मनाने मात्र त्या कार्यात चिकटूं नये. मन अगदी मोकळे ठेवावें. 'मला यांतून सुखदु:खाची अपेक्षा करावयाची नाही' असे त्यांनी सदोदित चिंतन ठेवावें. कार्य करीत असतां फल काय येईल याची चिंता न करितां बऱ्याचे सुख अथवा वाईटाचे दु:ख मानू नये. ज्यांचा परमेश्वराच्या अस्तित्वावर पक्का भरंवसा आहे, त्यांच्याकरितां कर्मयोगाने दुसरा मार्ग सांगितला आहे. हा मार्ग पुष्कळ सोपा आहे. अशा मनुष्यांनी सदैव उद्योगरत राहून सर्व कार्य ‘कृष्णार्पण' ह्मणावें. कार्याचें जें कांहीं फळ येईल तें 'माझें' नव्हे, तर 'परमेश्वराचें' आहे, असे त्यांनी सदोदित चिंतन करावे. जें कांहीं करावयाचें तें सारें परमेश्वराप्रीत्यर्थच करावयाचे. स्वतःच्या सुखासाठी ह्मणून कांहीं करावयाचेंच नाही असा पक्का निर्धार असावा. जे काही पहावयाचे, ऐकावयाचे अथवा दशविध इंद्रियांनी जे काही करावयाचें तें सर्व परमेश्वरासाठी. कांही चांगले काम त्यांच्या हातून घडले तर त्याबद्दल स्वतःच्या स्तुतीचा शब्दहि ऐकावयाचा नाही. कारण तें कार्य परमेश्वराचे ह्मणून स्तुतीसहि तोच पात्र आहे. आपण ह्मणजे निवळ परमेश्वराचे नोकर अथवा हस्तक असून तो