पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३७

आम्हांस सांगणे आहे. 'माझें' असें कांहींच म्हणूं नका. 'माझें' या शब्दाबरोबर दुःखाचें बीज पेरले जाते. मुलाच्या लीला पाहून आनंद करा, पण 'माझें' मूल म्हणूं नका. 'माझें घर, 'माझें शरीर हेहि म्हणूं नका. 'माझें हेच सर्व दुःखांचें आणि संकटांचे मूळ आहे. वास्तविक शरीर तुमचे नव्हे, माझें नव्हे आणि कोणाचेच नव्हे. सृष्टीच्या कायद्यास अनुसरून हजारों देह येतात आणि जातात. त्यांचे जाणे आणि येणे यांचे आपण नुसते साक्षी आहों. नुसत्या शरीराची खरी योग्यता ही भिंत अथवा हिजवरील तें चित्र याहून अधिक नाही. तर मग या मातीच्या गोळ्यास आपण इतके काय म्हणून चिकटावें? एखाद्या चिताऱ्याने चित्र रंगविले आणि तो पुढे चालता झाला, तर त्या चित्राचे त्यास स्मरणहि उरत नाही; पण तेंच जर त्याने 'माझें चित्र असे म्हटले तर तत्क्षणीच त्याच्या भोवती एक नवा बंध उपस्थित होतो. बंधाबरोबर त्याचे सहचारी जें दुःख तें येणारच.

 यासाठी कर्मयोग आपणांस कंठरवाने सांगतो की, 'मी' आणि 'माझें' या भावनेचा प्रथम त्याग करा. या भावनेवर थोडासा ताबा चालवितां येऊं लागला, की तेथे तसेच हट्टाने चिकटून राहून मनास या लाटेच्या तडाक्यांत जाऊ देऊ नका. असा ताबा ठेवून मग खुशाल जगांत जा आणि वाटतील तितकी कर्मे करा. वाटेल तेथे जा, आणि वाटेल त्या मंडळींत मिसळा. पाप तुह्मांस स्पर्शहि करूं शकणार नाही. कमळाचे पान पाण्यांत जन्मास येते आणि पाण्यातच राहते; पण पाणी जसें त्यास चिकटून राहू शकत नाही, तसेंच तुमचा ताबा तुमच्या मनावर आहे, तुह्मी त्याचे धनी आहांत, तोपर्यंत पाप आणि दु:ख तुह्मांस स्पर्शहि करूं शकणार नाहीत. यालाच वैराग्य असें ह्मणतात. 'साधकाची वृत्ति असावी उदास ।' ह्मणून संतांनी जो उपदेश केला आहे, ती उदासवृत्ति हीच. उदासवृत्ति पूर्ण बाणल्यावांचून कर्मयोगच काय, पण कोणताहि योग साध्य होणे शक्य नाही. अनासक्ति ही सर्व योगांचा मूळ पाया आहे. पण उदासवृत्ति ह्मणजे काय, याची कल्पना प्रथम बरोबर असली पाहिजे. कोणी घरदार सोडून अरण्यांत जाऊन आणि नुसती लंगोटी लावून कंदमुळे भक्षून राहिला, ह्मणून तो खरा उदासी असेलच असे नाही. त्याची हांव फक्त त्याच्या शरीरापुरतीच असं शकेल; आणि त्यामुळे त्याच्या धडपडीचे क्षेत्र आकुंचित झालें इतकेंच. उदासीनता या शब्दानें शारीरिक सुखदु:खाचा बोध होत नसून ती केवळ मानसिक स्थिति आहे. 'मी' आणि 'माझें' या बंध