पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

गरिबी अगर श्रीमंती हीसुद्धा थोडा वेळ टिकणारी आहेत. आमचे जे खरें अनंत अस्तित्व आहे, त्याशी या गरिबीचा, अगर श्रीमंतीचा, अगर लौकिक सुखाचा यत्किंचित्हि संबंध नाही. आमचे नित्य स्वरूप त्याच्या फार पलीकडचे आहे. येवढेच नव्हे, तर तें प्रत्येक दृश्यपदार्थापलीकडे आणि कल्पनेच्याहि पलीकडे आहे. 'यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसासह असें तें आपले नित्यरूप आहे. त्या आपल्या मूळरूपास परत जाण्याचा मार्ग नित्य कर्म करीत असतांच आपणांस आक्रमावयाचा आहे. यासाठी आपण एक सिद्धांत नित्य लक्ष्यांत वाळगिला पाहिजे; तो हा की, 'दुःखाची प्राप्ति कर्मामुळे होत नसून फलासक्तीमुळे होते.' कर्म आणि त्याचा कर्ता हे एकजीव होऊन राहिले ह्मणजे त्यापासून उद्भवणारी दुःखें भोगणें कर्त्यांच्या नशीबी येतेच येते. परंतु कर्म आणि कर्ता हे वेगळे झाले, तर कर्मापासून उद्भवणाऱ्या सुखदु:खाशी कर्त्यांचा काही संबंध उरत नाही. दुसऱ्याच्या एखाद्या सुंदर वस्तूचा नाश झालेला पाहून तिऱ्हाइतास कांहीं दुःख वाटत नाही. पण तिऱ्हाइताची स्वत:ची तसलीच वस्तु नाश पावली तर ? तर तो ऊर बडवून घेऊ लागतो. वास्तविक त्या दोन्ही वस्तु सुंदर होत्या. अगदी एकसारख्याच सुंदर होत्या. परंतु एकीच्या नाशाने दु:ख झाले नाही आणि दुसरीच्या नाशाने तें झालें. असें कां ? याचे कारण पहिल्या वस्तूशी त्याचे मन संलग्न नव्हतें; ते मोकळे होते; पण दुसऱ्या वस्तूशी त्याचे चित्त एकजीव होऊन गेले होते. यामुळे तिच्या नाशाने त्याच्या चित्तास धक्का बसून तेथे दुःखाची उत्पत्ति झाली. 'मी'आणि 'माझें' या दोन शब्दांत साऱ्या जगांतलें दुःख सांठविले आहे. ही वस्तु 'माझी' अशी भावना झाल्याबरोबर तेथें आसक्ति उत्पन्न झाली व तिजबरोबर तिचेंच अपत्य जें दुःख तेंहि येणारच. 'मी' आणि 'माझें' ही भावना धरून कोणतेंहि कर्म केलें अथवा या भावनेने प्रेरित असा एखादा विचार आपल्या चित्तांत उद्भवला की तत्क्षणीच आपण त्या कर्माचे अगर त्या विचाराचे गुलाम बनतों. तत्क्षणींच धन्याचे गुलामांत रूपांतर होते. 'मी' आणि 'माझ' या विचारानें आपलें चित्त तत्क्षणीच आपल्या भोंवतीं पडणाऱ्या शृंखलेचा एक एक दुवा घडवू लागते. 'मी' आणि 'माझें' हा विचार जसजसा वाढत जातो, तसतशी आपली शृंखला अधिक जड आणि कष्टप्रद होऊ लागते. यासाठी जगाच्या स्वरूपाकडे पाहून आनंद करा, आणि त्यांतून शिकण्यासारखें कांहीं असेल तें शिका; पण त्याच्या तडाक्यांत सांपडूं नका, असें कर्मयोगाचे