पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३५

पायरीहि आपण चढलों नाही असे होते. रसायनशास्त्रामुळे जसे पदार्थाचा बरोबर उपयोग आपणांस समजून क्षुद्र पदार्थापासून मोठी काय आपण निर्माण करितों, अथवा पदार्थविज्ञानशास्त्रामुळे अल्पशक्तीने जशी प्रचंड कार्ये आपण लीलेने पार पाडितों, तसेंच कर्मयोगाच्या सशास्त्र ज्ञानाने इच्छाशक्तीची योग्य संघटना करून आपण मुक्ति मिळवू शकतो. कर्मत्याग जर आम्हास अशक्य आहे, तर मग कर्म करून कर्मत्यागाचे पूर्ण फल मिळेल, अशी कांहीं युक्ति सांपडेल तर आम्हास हवी आहे. हे जग म्हणजे काही थोडासा वेळ विश्रांतीची जागा आहे, ही गोष्ट कबूल करणे भाग आहे. ही आपली निरंतर वस्तीची जागा नसून केवळ मधल्या मुक्कामाची जागा आहे हे प्रतिक्षणी आपल्या प्रत्ययास येते. येथून कोठे तरी दुसरीकडे जाणे आह्मांस भाग पडते. येथे राहून स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही, ही गोष्टहि दरक्षणी आमच्या अनुभवास येते. जर आम्हास स्वातंत्र्य-मुक्ति पाहिजे असेल तर ती जगाच्या पलीकडे कोठे तरी शोधिली पाहिजे, हे उघड आहे. या जगाच्या बंधनांतून बाहेर पडण्याचा मार्ग हळुहळु पण निश्चयाने आक्रमिला पाहिजे. एकदम 'नेति' ह्मणून जगाचे सर्व पाश एकदम तोडणारे काही पुरुष असतील. ज्याप्रमाणे सर्प आपली कात टाकून मोकळा होतो, त्याप्रमाणे केवळ इच्छामात्रेकरून जगाची बंधनें टाकून मोकळे होणारे धीर पुरुष कांहीं थोडेसे असतील यांत संशय नाही. पण त्यांचा मार्ग बाकीच्या गरीब दुबळ्यांस कितपतसा उपयोगी पडणार ? कर्म करता करतां मुक्ति मिळविण्याचा मार्ग त्यांस हवा आहे. हा मार्ग-हें कर्मरहस्य-कर्मयोगानेच आपणांस मिळविता येते. आपल्या प्रत्येक कर्मानें मुक्तिमंदिराची पायरी कशी बांधावी, हे रहस्य कर्मयोग आपणांस शिकवितो.

 'सदोदित कर्म करा, पण तें अलिप्तपणे करा,' हे कर्मयोगाचे मुख्य सांगणे आहे. आपण आपली बुद्धि थोडी सूक्ष्म केली तर आपणांस असे आढळून येईल की, कर्म करता करतां आपण स्वतःस विसरून कर्माशीच एकजीव होऊन राहतो. हीच आपली पहिली मोठी चूक आहे. कर्म आणि आपण निरनिराळे आहों, ही भावना प्रथम दृढ केली पाहिजे. याच भावनेने आपण आपले मन स्वतंत्र ठेविले पाहिजे. आपणाभोवती अनेक प्रकारची दु:खें आणि संकटें आपण हरघडी पाहतो; परंतु जगाचे अस्तित्वच जर त्यांच्यावर अवलंबून आहे, तर त्यांजबद्दल अधिक विचार करून आपले डोके फिरविण्यांत काय फायदा आहे ? ती अनंत काल अशीच राहणार आहेत. त्याचप्रमाणे