पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

याहून अन्यप्रतीच्या सर्व लोकांस कर्म करणे भागच आहे. ज्याप्रमाणे उंचावरून खोल दरीत पडणारा पाण्याचा झोत खाली पडल्याबरोबर प्रथम भोंवरा उत्पन्न करतो, आणि त्या भोवऱ्यांत चक्राकार फिरून नंतर पुढे जातो, तद्वतच मनुष्यप्राण्याचीहि गति आहे. मनुष्यप्राणी जन्मास आल्यापासून या संसाररूपी भोवऱ्यांत सांपडतो. त्यांत चक्राकार परिभ्रमण करीत असतां तो कोणाला बाप ह्मणतो, कोणाला भाऊ ह्मणतो, 'माझी कीर्ति, माझें नांव' असे ओरडतो आणि अनुभवाने शहाणा होऊन शेवटी आपल्या मुक्तस्थितीस परत जातो. सर्व विश्व नेहमी याच स्थितीत असतें. समजून अथवा न समजतांहि आपण सर्व जगद्रूपी स्वप्नांतून जागे होण्याचाच प्रयत्न करीत आहों. या संसाररूपी भोवऱ्यात जे जे अनुभव आपणांस प्राप्त होतात त्यांचा उद्देश हाच की त्यांच्या योगाने आपणांस त्या भोवऱ्यांतून सुटण्यास मदत व्हावी.

 आपणांपैकी बहुतेकांस कर्मसंन्यास करता येणे शक्य नाही. आपणांस कर्माचा अवलंब केलाच पाहिजे. असें आहे, तर कर्म करता करतांच मुक्ति मिळविण्याचे साधन असेल तर ते आपणांस हवें आहे. कर्मयोगानें असें साधन आपणांस दिलें आहे. कर्मयोगाने आपणांस कर्मसंन्यासाचे रहस्य प्राप्त होते. आपणासभोंवतालचे सर्व विश्व कार्यरत आहे हे आपण नित्य पाहतो. या सर्व कार्याचा उद्देश काय ? मुक्ति-स्वातंत्र्य हाच या सर्व कार्याचा अंतिम हेतु आहे. जगांतील अणुरेणूपासून तों हत्तीपर्यंत एकंदर सर्व प्राणी केवळ मुक्तीसाठीच धडपडत आहेत. या शरीरबंधांतून सुटावें, मनोबंधाचा त्याग करावा आणि आत्म्याला मोकळे करावें यासाठीच ही सारी गडबड आणि धडपड सुरू आहे. प्रत्येक वस्तूची गति पाहिली तरी तिचा हेतु हाच आहे. मुक्ति-स्वातंत्र्य-यावांचून दुसरा कोणताहि हेतु या गतीच्या मुळाशी नाही. सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि इतर सर्व गोलसुद्धा बंधनातून मुक्त होण्याकरितांच भ्रमण करित आहेत. सशास्त्र ज्ञानाच्या अभावी आपणास अनंतकाल प्रवास करावा लागेल आणि अनेकवेळां ठोकरा खाण्याचा प्रसंग आपणावर येईल. परंतु कर्मयोगाचे रहस्य आपणांस बरोबर समजले, तर हा सर्व त्रास आपणांस चुकवितां येतो. कर्मयोग, हे कर्मरहस्य सांगणारे शास्त्र आहे. कर्म करीत असतां त्याचवेळी त्या कर्मापासून आपली शक्ति कशी वाढवावी आणि तिचा उपयोग मुक्तीकडे कसा करावा, याचे ज्ञान आपणांस कर्मयोगापासूनच प्राप्त होते. अनंत काल आपण कर्म करीत राहिलों तरी आपले कर्म अशास्त्र असेल तर आपली सर्व शक्ति अनाठायी खर्च होऊन मुक्तिपथाची एक