पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[५]

इमारत वेदांच्या पायावर आहे; पण खुद्द 'वेद' या शब्दाची व्याख्याहि त्यांनी धार्मिकस्वरूपाची केली आहे. ते ह्मणतात 'वेद ह्मणजे पुस्तकें नव्हत. निर. निराळ्या ऋषींनी जे धार्मिक सिद्धांत ठरविले, त्या सर्वांस समुच्चयेंकरून वेद अशी संज्ञा आहे. जें कांहीं सत्य असेल तें सर्व वेद या संज्ञेस पात्र आहे.' सनातनधर्माचे स्वरूप सांगतांना ते ह्मणाले 'वेदांताच्या अत्युच्च तत्वांपासून तों पौराणिक स्वरूपाच्या मूर्तिपूजेपर्यंतचे सर्व पंथ, तसेंच बुद्धाचा शून्यवाद व जैनांचे निरीश्वरमत या सर्वांचा सनातन धर्मात अंतर्भाव होतो. हिंदूंतील अनेक मतें व मूर्तिपूजादिकांचे प्रकार इतरांच्या दृष्टीने वेडगळपणाचे दिसले तरी ती परिस्थित्यनुरूप झालेली एकाच सनातनधर्माची अनेक रूपे आहेत. प्रत्येकाची इष्ट देवता वेगळी असली ह्मणून त्याचा धर्म वेगळा होत नाही असें स्वामींचें मत होते. किंबहुना स्वतःची स्वतंत्र इष्टदेवता व इष्टमार्ग असणे हा प्रत्येकाचा. हक्कच आहे असे ते ह्मणत. सनातनधर्माची ही व्याख्या मान्य केली ह्मणजे हिंदधर्माइतकें विस्तृत साम्राज्य दुसऱ्या कोणत्याहि धर्माचें नाहीं असें दिसून येईल. किंबहुना तें विश्वव्यापी साम्राज्यच होय. खुद्द ब्रह्माची भेट होईपर्यंत सनातनधर्माचा मार्ग संपत नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याने पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे परमात्म्याची भेट कोणत्या मार्गाने घ्यावी हे ज्याचे त्याने ठरवावें. धर्मस्वातंत्र्याचे हे अत्यंत परिणत रूप आहे.

 पण सनातनधर्माची प्रौढी केवळ इतक्यानेच संपते असे नाही. प्रत्येक व्यक्तीस धर्माचे पूर्ण स्वातंत्र्य त्याने ठेविलें आहे; इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यक्ति पूर्ण स्वतंत्र-मुक्त-आहे, मृत्यूच्या पलीकडे आहे आणि केवळ आनंदरूप आहे. असें तो उच्चघोषाने सांगत आहे. 'सच्चिदानंद' या एका शब्दांत अनेक धर्माचा आणि अनेक पंथांचा अंतर्भाव होतो. या एका शब्दाच्या अनुभवाकरितांच हे अनेक धर्म आणि अनेक पंथ इतका काल खटपट करीत आहेत. एका व्याख्यानांत स्वामी ह्मणाले, 'देवळाची एक नवी इमारत बांधण्याचे काम सध्या आपणा सर्वांस करावयाचे आहे. त्या ठिकाणी येण्यास प्रत्येक व्यक्तीस पूर्ण अधिकार असावा. त्याच्या गाभाऱ्यांत फक्त ॐ या एका अक्षराचीच स्थापना करावयाची. या कामी आपणा सर्वांच्या मदतीची मी याचना करतो.' स्वामीजींचे हे शब्द ऐकून आह्मांपैकी कित्येकांच्या मनांत भरतभूमिरूपी विश्वदेवालयाची कल्पना उभी राहिली. जगांतील सर्व धर्माचे लोक या प्रचंड देवालयांत एकवटले आहेत. नामरूपातीत अशा स्वरूपाची भेट घ्यावयाची हाच त्यांचा उद्देश आहे.