पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६]

आह्मी अनंत मार्गानी चालत असलो, तरी सर्वांच्या भेटीचे ठिकाण सनातनधर्मातच आहे. दृश्यांतून अदृश्यांत प्रवेश करणे, आकारांतून निघून निराकारांत जाणे आणि अनंतत्वांत एकत्व अनुभविणे हाच सर्वाचा उद्देश आहे. याविरुद्ध कोणीहि मार्ग आक्रमण करीत नाही, असे सांगणाऱ्या धर्माची इतर सर्व उच्च धर्माशी एकवाक्यता असली तर त्यांत नवल काय ? इतर मोठ्या धर्मात आणि सनातनधर्मात फरक असला तर तो इतकाच की स्वतःस पवित्र व इष्ट वाटणाऱ्या मार्गाने जाण्याची त्याने प्रत्येकास पूर्ण परवानगी दिली आहे.

 स्वामीजींनी निवळ आपल्या पदरचें असें कांहीसुद्धा सांगितले नाही. भगवान् श्रीकृष्णाप्रमाणे, अथवा भगवान् श्रीशंकराचार्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक वाक्य श्रुति आणि उपनिषदें यांच्या आधारानेच उच्चारले आहे. सनातनधर्म नव्या परिस्थितीस अनुकूल अशा स्वरूपाने सांगावयाचा इतकीच कामगिरी त्यांनी केली. स्वामीमहाराज जन्मास आले नसते तरी त्या प्रमेयांस कांही उणीव आली असती असें नाहीं. फरक इतकाच की, नव्या परिस्थितीमुळे त्यांचे स्पष्ट स्वरूप आह्मांस समजले नसते. त्यांतील विरोधाभासाने आमचा गोंधळ झाला असता. आह्मासारख्या आतास मोक्षमार्ग आज पूर्ण उघडला गेला आहे, तो स्वामीजींच्या अभावी बंद राहिला असता. सनातनधर्माचे प्रवचन स्वामींनी पूर्ण अधिकारयुक्त वाणीने केले आहे; पण तें केवळ वाक्पटु पंडिताप्रमाणे नसून अनुभवी ब्रह्मनिष्ठाप्रमाणे केलें आहे. स्वामी श्रोत्रीय असून ब्रह्मनिष्ठहि होते. चैतन्यरत्नाकराच्या तळापर्यंत बुडी मारून तेथील संपूर्ण कोश त्यांनी प्रथम हस्तगत केला आणि नंतर आह्मां पामरांच्या करुणेस्तव तो मार्ग त्यांनी प्रकट केला. हा आप्त, हा परका, हा ब्राह्मण आणि हा चांडाळ असा भेद मनांतहि न आणतां त्यांनी हे गुह्य सर्वांस सारखेंच प्रकट केले.

 त्यांनी नवें असें कांहींच सांगितले नाही असें झटले, तथापि तसें ह्मणणेहि थोडेंसें अयुक्त आहे. अद्वैतसिद्धांत हा यच्चयावत् धर्ममार्गाचा मुकुटमणि आहे, असे सांगतांना त्यांनी द्वैत आणि विशिष्टाद्वैत या अद्वैतसिद्धांताच्या पायऱ्या आहेत असेंही सांगितले, हे विसरता कामा नये. परमेश्वर साकार आहे आणि निराकारहि आहे, असें भगवान् श्रीरामकृष्ण ह्मणत असत. एकाच ब्रह्माची व्यक्त आणि अव्यक्त अशी दोन स्वरूपें असून निरनिराळ्या दर्जाच्या भावनेनुरूप त्यांचा अनुभव होतो, आणि सर्वत्र एकरूपच पाहणे एकमेवाद्वितीयम् ' असा अनुभव होणे ही अत्युच्च अनुभवाची भावना आहे, असें श्रीरामकृष्ण यांचे मत