पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[४]

कांहीच सांगितले नाही; इतकेच नव्हे तर आपल्या गुरूसंबंधीहि कांही सांगितले नाही. मागे उभ्या असलेल्या राष्ट्रपुरुषाच्या प्रेरणेस अनुसरून पासिफिक समुद्राच्या तीरावरील घोरत पडलेल्या जनतेस त्यांनी जागे केलें. कित्येक सहस्रकांचे आपले अनुभवजन्य ज्ञान भारतीय राष्ट्रपुरुष, जणुं काय, त्यांच्या मुखाने बोलत होता ! आणि तरुण असा पाश्चात्त्य पुरुष तें दिव्य ज्ञान, मोठ्या औत्सुक्याने आपल्या हृदयसंपुटांत सांठवीत होता. आपलें खरें मोठेपण आणि सामर्थ्य कशांत आहे, याचे रहस्य समजण्यास हा तरुण पुरुष अत्यंत उत्सुक झाला होता.

 स्वामीजी ज्या उच्चासनावर उभे होते, तेथेच दुसरेहि अनेक पंथांचे आणि धर्माचे आचार्य विराजमान झाले होते; परंतु विश्वव्यापी धर्मरहस्य कथन करण्याचा अधिकार एकट्या स्वामीजीसच प्राप्त झाला होता. स्वामीजींनी सांगितलेला धर्म एखाद्या महासागरासारखा असून इतर आचार्यांचे पंथ, हे त्या महासागरास मिळू पाहणाऱ्या लहान मोठ्या नद्यांसारखे होते. 'अनेक धर्म आणि अनेक पंथ हे मजकडे येण्याचेच अनेक मार्ग आहेत.' 'मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।' हा भगवान् श्रीकृष्णांचा निरोप स्वामीजींनी तेथे कथन केला. 'यद्यद्विभूतिमत्सर्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥' हे भगवंताचे वचन कथन करून, अनेक पंथांची आणि धर्माची स्वामीजींनी जणुं एकवाक्यताच केली. 'मनुष्य पापांतून पुण्याकडे प्रवास करीत नाही; दु:खांतून सुखाकडे जात नाही; अथवा असत्यांतून सत्यांत प्रवेश करीत नाही; तर कमी पुण्यांतून अधिक पुण्यांत, कमी सुखांतून अधिक सुखांत व अंधुक सत्यांतून पूर्ण प्रकाशमान् सत्यांत प्रवेश करतो. चैतन्याचा अनुभव घेऊन तो स्वतः पूर्ण चैतन्यस्वरूप होतो. ज्या दिवशी मनुष्य प्राणी स्वतः सच्चिदानंदरूप होईल त्या दिवशीच त्याच्या धर्मजीवनाचा शेवट झाला असें ह्मणतां येईल. सकल विश्वांत मृत्यूचे साम्राज्य असतां अविनाशी स्वरूप सांपडणे, विश्वाच्या स्वरूपात दरक्षणी बदल होत असतां त्याच्या स्थिर अधिष्ठानावर आपण आरूढ होणे व अनेकतेने भासमान होणाऱ्या विश्वचैतन्याची एकतानता अनुभविणे ही जीविताची इतिकर्तव्यता आहे;' असा निरोप त्या दिवशी भारतीय राष्ट्रपुरुषाने तरुण पाश्चात्य राष्ट्रपुरुषास स्वामीजींच्या मुखाने कथन केला.

 सर्व जगाला धर्मज्ञान सांगण्याचा जो हक्क भरतभूमीला आहे त्याचा जणुं ताम्रपटच स्वामींच्या हस्ते कोरला गेला आहे. स्वामींनी उभारलेली धर्माची