पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१३१

 या विश्वाची उत्पत्ति कोठून झाली, याचे अस्तित्व कशावर अवलंबून आहे आणि याचे पर्यवसान कोठे होणार, अशा प्रकारची प्रश्नपरंपरा नेहमी विचारण्यांत येत असते. तिचे उत्तर असें की विश्वाची उत्पत्ति पूर्णापासून झाली असून, बद्धता ही त्याची स्थिति-अस्तित्व-आहे, आणि पूर्वीच्या पूर्णावस्थेतच त्याचा लय होणार. यासाठी मनुष्यप्राणी पूर्ण आहे असे जेव्हां आपण ह्मणतो, तेव्हां आपल्या मनांत या अनंत अस्तित्वाच्या एका अत्यंत सूक्ष्म अशा भागाविषयींच बोलावयाचे असते, हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. आपल्या दृष्टीस पडणारे हे शरीर आणि हे मन, ही अनंत अस्तित्वांतील एका सूक्ष्म बिंदूइतकी आहेत. खुद्द हे सर्व विश्व, अनंत अस्तित्वाचा एक सूक्ष्म अंश आहे. आमचे सर्व कायदे, सर्व बंधनें, सर्व सुखें, सर्व दुःखें आणि सर्व आशा अतिशय विशाल झाल्या, तरी या बिंदुरूप विश्वाबाहेर जाऊ शकत नाहीत. आमच्या सर्व संस्कृती आणि विकृती या सूक्ष्म बिंदूंत सांठविल्या आहेत. तर मग यावरून हे सर्व विश्व, की ज्याला आपल्या चित्ताबाहेर अस्तित्व नाही-तें असेंच चालावें अशी अपेक्षा करणे, आणि स्वर्गसुख भोगण्याची इच्छा करणे हे किती पोरकटपणाचे आहे, याची तुह्मीच कल्पना करा. स्वर्गसुख ह्मणजे काय, तर याच जगाची सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ति. ज्यांना आपण कायदे-नियम-असें भपकेबाज नांव देतो आणि ज्यांवर या बिंदुरूप विश्वाचे अस्तित्व अवलंबून आहे असे आपण समजतो, त्यांवरून अनंत अस्तित्वाचे नियम ठरवू पाहणे, हे किती अशक्य आणि बालिशबुद्धीचे लक्षण आहे, याची तुह्मांस नि:संशय खात्री पटली असेल. या बिंदुरूप विश्वांतच अनंत काल कोंडलेले राहून यांतील पंकाचे पुन:पुनः चर्वण करण्याची ज्यांना इच्छा असेल, आणि ही इच्छा तृप्त करण्याजोगा सवलतीचा धर्ममार्ग ज्यांना हवा असेल त्यांची बुद्धि वठून गेलेल्या झाडासारखी आहे, असें तुह्मी निश्चित समजा. आपल्या चालू स्थितीहून उच्चतर स्थिति असणे शक्य आहे, ही कल्पनासुद्धा त्यांस शिवत नाही. चालू स्थिति हीच त्यांच्या दृष्टीने मानवी जीविताची इतिकर्तव्यता असते. स्वतःच्या अनंत रूपाचा त्यांस पूर्ण विसर पडलेला असतो. चालू क्षणी जी सुखदुःखें अनुभवास येतात त्यांहन कांही निराळी स्थिति असेल असे त्यांस स्वप्नांतहि वाटत नाही. रोज अनेक वस्तूंचा नाश होत आहे हे पाहूनहि त्याच वस्तु निरंतरच्या आहेत या कल्पनेची मिठी ते सोडीत नाहीत. तृष्णा, तृष्णा ह्मणून एकसारखे ते मृगजल पीत सुटतात. आपल्या बिंदुमात्र विश्वाच्या बाहेर अनंत अस्तित्व आहे, त्यांत