पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

विचारांत आणतां येते आणि ज्याची ज्याची आपण नुसती कल्पना करूं शकतों, त्या सर्व अस्तित्वाला आपण विश्व अशी संकलित संज्ञा देतो. आपण ज्यांना कायदे असें ह्मणतो, त्यांची व्याप्ति अशा विश्वापुरतीच असणार हे उघड आहे. याबाहेरील अस्तित्वांत नुसत्या कल्पनेनेंहि जर आपल्या मनाचा प्रवेश होत नाही, तर तेथे हे आपले कायदे आपण लागू कसे करणार ? त्यांत घडून येणाऱ्या कार्यपरंपरेची तुलना करण्यास तिच्याशी सदृश अशी परंपरा आपल्या मनांतच तयार नाही. यामुळे अमुक कारण आणि अमुक त्याचे कार्य असें ठरविण्यास आपणांस कोणतेंहि साधन उपलब्ध नाही. यावरून जेव्हां कोणतीहि वस्तु नाम-रूप धारण करते, तेव्हांच ती कायद्याच्या हद्दीत येते असें उघड झाले. जेथे आपले मन पोहोचू शकत नाही, तेथें देश-काल-निमित्त या रेषात्रयीला अस्तित्व नाही; आणि जेथे या दोहोंचे अस्तित्व नाही, तेथें नाम-रूपहि नाही. यांतच आणखी एक गोष्ट आपोआप सिद्ध झाली; ती ही की, स्वतंत्र इच्छा असें मनाच्या काही विशिष्ट स्थितीस जे आपण नांव देतो, त्याला अस्तित्वच नाही. 'स्वतंत्र' आणि 'इच्छा' या दोन शब्दांचा संधि होणे, हे दोन शब्द एकत्र उच्चारणे ह्मणजे अर्थशून्य शब्द उच्चारण्यासारखेच आहे. 'स्वतंत्र' आणि 'इच्छा' हे दोन शब्द परस्परविरुद्ध अशा अर्थाचे द्योतक आहेत. इच्छेचें अस्तित्व कल्पनेवर अवलंबून आहे. कल्पना विश्वाने बद्ध आहे आणि विश्व देश-काल-निमित्ताने बद्ध आहे. अशा बद्ध वस्तुसंघांतून मुक्त-स्वतंत्र-इच्छा कशी निर्माण होणार ? ज्या कोणत्याहि वस्तूबद्दल आपणांस ज्ञान झालेले असतें अथवा होण्याचा संभव असतो, ती प्रत्येक वस्तु आणि तें ज्ञान ही पूर्वीच्या निमित्तानेच उद्भवलेली असतात. ती निमित्तबाह्य ह्मणजे स्वतंत्र नसतात. जी वस्तु आज कार्यरूप आहे असें आपणांस वाटत असते, तिजवर दुसऱ्या काही वस्तूंचा आघात होऊन ती स्वतः कारणरूप होण्याचा संभव आहे. यावरून वस्तुनिर्मित ज्ञान स्वतंत्र नाही असे सिद्ध झाले. परंतु वस्तूच्या आघातामुळे ज्या मूलरूपाने हे ज्ञानाचे रूप धारण केलें, तें मलरूप स्वतंत्र आहे. जेव्हां हैं ज्ञान देश-काल-निमित्ताच्या हद्दीतून बाहेर जातें, तेव्हां तें स्वतंत्र हात; ह्मणज आपल्या मूलरूपांत एकजीव होते. ते मूळचें स्वतंत्र आहे, पण देश-काल-निमित्ताने बद्ध होऊन वस्तु आणि ज्ञान या स्वरूपास येते व या देश-काल-निमित्ताचे अस्तित्व संपले, की त्याबरोबर त्याचे पारतंत्र्य नष्ट होऊन ते आपल्या स्वतंत्र मूलरूपास जातें.