पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

काही कार्यपरंपरा घडून आली होती आणि आतांहि त्या परंपरेपैकी एक कार्य घडून आलेले पाहतांच बाकीची कार्येहि पूर्वीप्रमाणेच घडून येतील अशी जी अपेक्षा आपल्या चित्तांत उद्भूत होते, त्या अपेक्षेलाच आपण नियम अथवा कायदा असें नांव देतो. यावरून असे सिद्ध होते की, सृष्टींत अमुक एक नियम अगर कायदा असा कांहीं अस्तित्वात नाही. यासाठी पृथ्वीच्या मध्यबिंदूंत गुरुत्वाकर्षणाचे सामर्थ्य असणे हा कायदा आहे-नियम आहे--असें ह्मणणे चुकीचे आहे. किंबहुना सृष्टीतील अमुक एक वस्तु अमुक एका नियमाने बद्ध आहे, असें नाही; तर एका विशिष्ट रीतीनें-पद्धतीने-कांही वस्तुसंघात पाहण्याची आपणांस संवय लागली आहे, असे समजावें. अमुक एक कार्यपरंपरा एकाच विशिष्ट रीतीने घडते असा अनुभव आपणांस आला ह्मणजे आपण त्या रीतीस अथवा पद्धतीस नियम-कायदा-असें ह्मणतो. यावरून त्या कायद्याने अथवा नियमाने वस्तु बद्ध नसून त्या कायद्याची व्याप्ति आपल्या चित्तांतच असते असें सिद्ध होतें.

 आतां यापुढे आपण जे काही नियम अगर कायदे विश्वव्यापी आहेत असें समजतो, त्याचा अर्थ काय हे पाहावयाचे आहे. यासाठी विश्व ह्मणजे काय, याचा अर्थ प्रथम निश्चित केला पाहिजे. देश-काल-निमित्त या रेषात्रयीने एकंदर अस्तित्वाचा जेवढा भाग अंकित केला जातो, त्याला आपण विश्व असें नांव देतो. एकंदर अस्तित्व अनंत आहे. त्यापैकी काही भाग देश-काल-निमित्त या उपाधीने बद्ध झाल्यासारखा दिसतो आणि त्यास आपण विश्व अशा संज्ञेनें ओळखतो. या उपाधिविरहित असें अनंत अस्तित्व त्यापलीकडे आहे. ज्यांना आपण नियम अथवा कायदे ह्मणतो, त्यांचे अस्तित्व वस्तूंत नसून आपल्या मनांतच असते, हे आपण नुकतेच सिद्ध केले आहे. तेव्हां विश्वव्यापी कायदे असें आपण ज्यांस ह्मणतो त्यांचेंहि अस्तित्व देश-काल-निमित्त या उपाधीने निगडित असलेल्या विश्वांतच असणे शक्य आहे. या उपाधीबाहेर असलेल्या अस्तित्वांत हे कायदे असणे शक्य नाही. विश्व असें ज्याला आपण ह्मणतों तें व्यष्टिरूप आहे. व्यष्टि ह्मणजे अनेकांपैकी एक. जसें गांव ही समष्टि आणि घर ही व्यष्टि. अरण्य ही समष्टि आणि झाड ही व्यष्टि. याचप्रकारें अनंत अस्तित्वापैकी जितका भाग कोणत्या तरी रीतीने आपल्या मनाच्या हद्दीत येतो, त्याला आपण विश्व असें ह्मणतों. ह्मणजे अनंत अस्तित्व समष्टिरूप असून विश्व हे व्यष्टिरूप आहे. आपल्याला जे जे दिसते, जें जें स्पर्शितां येते, जें जें ऐकू येते.स्वा. वि.९