पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

बद्ध आहेत. ज्याप्रमाणे कारण उत्पन्न झाले की त्याचे कार्य घडलेच पाहिजे, तें टाळणे जसें सर्वथा अशक्यच आहे, त्याचप्रमाणे कर्म झाले की त्याचे फल येणारच; ते टाळणे अशक्य आहे. हा नियम साऱ्या विश्वरचनेच्या मुळाशी आहे असे आमच्या तत्ववेत्त्यांचे ह्मणणे आहे. या सिद्धांताप्रमाणे चालू कर्माचें स्वरूप दोन प्रकारचे आहे असे सिद्ध होते. चालू जीवनक्रमांत पाहणे, विचार करणे आणि कर्म करणे इत्यादि ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या सर्व पूर्वकर्मानुरूप घडत असतात हे एक स्वरूप. चालू जीवनक्रमाचे दुसरें स्वरूप असें आहे, की त्यांत ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या सर्व कारणरूप होऊन पुढील जन्मींच्या कार्याची ह्मणजे जीवनक्रमाची तयारी करीत असतात. आतां येथे नियम या शब्दाचा अर्थ काय, याचा विचार केला पाहिजे. कोणतीहि गोष्ट पुन्हा पुन्हा घडून येणे हे ज्या प्रवृत्तीमुळे होते त्या प्रवृत्तीस नियम असें ह्मणतात. आपण प्रथम कांहीं कार्य घडलेले पाहतों आणि नंतर त्याचे पाठोपाठ दुसरें कार्य घडतें हेंहि आपण पाहतो. त्यावेळी तशाच प्रकारची कार्यपरंपरा पुन्हां पुन्हां घडत राहील असें आपल्या मनांत साहजिक येतें. हिंदुतत्वज्ञांपैकी ज्यांना नैय्यायिक असें ह्मणतात त्यांनी या नियमास व्याप्ति असें नांव दिले आहे. अमुक एक गोष्ट घडली झणजे त्या कारणापासून दुसरी अमुक एक कार्यरूप गोष्ट घडणारच, असे जे आपल्या मनांत येते त्याचे कारण पूर्वीचा अनुभव आहे असें नैय्यायिकांचे मत आहे. कांहीं कार्यपरंपरा पूर्वी आपण पाहिलेली असते, व ती जशीच्या तशीच आपल्या मनांत बीजरूपाने ग्रथित झालेली असते; आणि पुन्हां जेव्हां आपण काही कार्य घडलेले पाहतो त्यावेळी त्या कार्याशी सदृश अशा पूर्वानुभवाशीं तें कार्य आपण तत्क्षणींच मनांत ताडून पाहतो. अशा वेळी जो विचार अथवा शास्त्रीय भाषेत बोलावयाचे म्हटले तर जो तरंग आपल्या चित्तांत उद्भत होतो तो आपल्या इतर मित्रांसहि जागे करितो व अशा रीतीने ती पूर्वीची सर्व कार्यपरंपरा पुनः जशीच्या तशीच आपल्या चित्तांत जागत होते, आणि त्या कार्यपरंपरेशी सांप्रतचे कार्य ताडून पाहून त्यावरून आतां या कार्यापुढे दुसरे अमुक काय घडणार असे आपल्या मनांत येते. याच पूर्वानुभवास आपण नियम ह्मणतों, असें नैय्यायिकांचे मत आहे. ही जी कार्यपरंपरा आपल्या चित्तास व्यापून राहिलेली असते, तिच्याच एका विशिष्ट स्वरूपास आपण कारण असें ह्मणतो. याच व्यापून राहण्याच्या स्थितीस संस्कृत भाषेत व्याप्ति असें नांव आहे. पूर्वी अमुक प्रकारे