पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१२७

आहे. हा अनुभव वाढत गेला ह्मणजे आपल्यांतील इच्छाशक्ति जागृत होऊं लागते. प्रथम ज्ञानाची इच्छा उद्भवते. इच्छा पक्की बळावली ह्मणजे तोच ध्यास लागून तीच इच्छा अधिक बलवत्तर होते. तिला संपूर्ण बळ प्राप्त झाल्यावर ती तुमच्या रोमरोमांतून खेळू लागते व शेवटी 'मी' आणि 'माझें' हे भान संपूर्ण नाहींसें होतें. अहंकाराचा यत्किचित् अंशहि उरत नाही, व अशा रीतीने तुह्मी पूर्णत्व पावतां. पूर्णत्व पावणे हे कोणत्याहि विशिष्ट मतावर अवलंबून नाही; अथवा विशिष्ट धर्मावर अगर पंथावरहि अवलंबून नाही. कोणी आपणास यहुदी ह्मणवो, ख्रिस्ती ह्मणवो अथवा आणखी काही ह्मणवो. पूर्णत्वाचा त्याशी कांही संबंध नाही. तुह्मीं अहंकाराचा त्याग केला आहे की नाही, हा काय तो महत्वाचा प्रश्न आहे. जर तुमचा अहंकार गेला असेल तर कोणत्याहि धर्मपुस्तकाची एखादी ओळहि न वाचतां अथवा एखाद्या देवळांत पाऊलहि न ठेवतां बसल्या जागीच मुक्ति तुह्मांस माळ घालील. प्रत्येक योगाने मार्ग जरी निरनिराळे सांगितले असले तरी एका योगाच्या अभ्यासांत दुसऱ्या एखाद्या मार्गाची मदत घ्यावी लागतेच असे नाही. कारण, प्रत्येक योग मनुष्याला पूर्णत्वाचा मार्ग दाखविण्यासाठीच निर्माण झाला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग अगर भक्तियोग यांपैकी कोणत्याहि एका मार्गाने मोक्ष निश्चित मिळेल. अमक्या एका विशिष्ट मार्गानेच मोक्ष मिळेल असें ह्मणणारे मूर्ख होत. 'सांख्य योगौ पृथग्बालाः प्रवदंति न पंडिताः।' ह्मणजे ज्ञानमार्ग व कर्ममार्ग हे भिन्न आहेत असें मूर्ख ह्मणतात; पंडित तसें ह्मणत नाहीत, असा भगवान् श्रीकृष्णांचा अभिप्राय आहे. जरी हे भिन्न दिसले तरी त्यांचे अंतिम पर्यवसान एकच आहे ही गोष्ट पडितांस ठाऊक असते.

प्रकरण ७ वें.
मुक्ति.

 आपलें सांप्रतचें जीवित ज्याचे कार्य आहे त्यापूर्वकर्मासहि आध्यात्मिक भाषेत कर्म असें ह्मणतात हे पूर्वी सांगितलेच आहे. ज्याचा सांप्रतच्या जीवितावर काही परिणाम झाला आहे, अशा प्रत्येक कृत्यास व विचारास कर्म अस नांव दिले आहे. ज्याप्रमाणे कारण आणि त्याचे कार्य ही अनादिसिद्ध नियमांनी बांधिलेली आहेत त्याचप्रमाणे कर्म आणि फल हीसुद्धा त्याच नियमांनी